कल्याणमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या मुलांसह सात जणांवर गुन्हा, विकासकाच्या कार्यालयात तोडफोड

कल्याणजवळीत वडवलीतील गृहप्रकल्पात बांधकाम साहित्य पुरवठ्याचे काम मिळाले नसल्याच्या रागातून शिंदे गटाचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्या दोन मुलांसह सात जणांनी बिल्डरच्या कार्यालयात घुसून धुडगूस घालत तोडफोड केली. कर्मचारी आणि मजुरांना धमकावून काम बंद पाडले. विकासक मंगेश गायकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्यात विकासक मंगेश गायकर (५८) यांच्या तक्रारीवरून वैभव पाटील, पंकज पाटील, सुनील पाटील, उद्धव पाटील, ध्रुव पाटील, करण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी आरोपी हातात लाकडी दांडके घेऊन ‘मंगेश स्टार’, ‘मंगेशी हेवन’ आणि ‘जेमिनी’ या प्रकल्पांवर आले. त्यांनी विक्री कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.
यावेळी आरोपी सुनील पाटील याने आम्हाला का काम देत नाही? असे विचारत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. वैभव पाटील याने प्रकल्पावर लागणारे बांधकाम साहित्य आमच्याकडूनच घेण्याची सक्ती केली. तसे न केल्यास प्रत्येक वाहनामागे ३ हजार रुपये देण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

Comments are closed.