कल्याण-माळशेज महामार्ग बनला डेंजर झोन; अवघड वळणे काढली नाहीत, जुन्या पुलांच्या मजबुतीकरणात चालढकल

>> गोपाळ पवार

पुणे-नाशिक जिल्ह्याला ठाणे जिल्ह्याशी जोडणारा माळशेज महामार्ग डेंजर झोन बनला आहे. 400 कोटी रुपये खर्चुन कांबा ते सावर्णे या मार्गाचे काँक्रीटीकरण केले जात आहे. मात्र नियम धाब्यावर बसवून ही कामे केली जात असल्याचा आरोप आदीवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष दिनेश जाधव यांनी केला असून याविरोधात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे उद्या तक्रार केली जाणार आहे. या मार्गावरील अवघड वळणे काढण्यात आलेली नाहीत. जुन्या पुलांचे मजबुतीकरण करताना थुकपट्टी लावण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे साईंडपट्टांची कामे करताना झाडांचे बुंधे उघडे ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात महामार्गावर ही धोकादायक झालेली झाडे कोसळून अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चुन केल्या जाणाऱ्या काँक्रीटीकरणाच्या या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

याची उत्तरे अधिकारी कंत्राटदार देतील का?

400 कोटी रुपये खर्चुन कांबा ते सावर्णे या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. यामध्ये रायते पूल, मुरबाडचा फ्लायओव्हर, सावर्णे रस्ता, 26 मोऱ्या (साकव), दगड तसेच काँक्रीटचे 10 किमी संरक्षक भिंती, आठ छोटे पूल बांधण्यात आले आहेत. मात्र उदाळडोह, फांगूळ गव्हाण येथे असलेल्या दोन जुन्या पुलांची वरवरून डागडुजी करून कलर देण्यात आला आहे. सावर्णे हद्दीतील जीर्ण पुलाचीदेखील अशीच वरवरून डागडुजी करत वेळ मारून नेण्यात आली आहे. परंतु यातील काही पुलाचा स्लॅब निखळला असून गंजलेल्या शिगा त्यातून बाहेर आल्या आहेत. भविष्यात याठिकाणी दुर्घटना होण्याची भीती माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुकाप्रमुख भाऊ देशमुख, आरपीआय (सेक्युलर) जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने यांनी व्यक्त केली आहे.

कांबा ते सावर्णे या 55 किमी मागांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी 400 कोटींचा ठेका आर.आर.एम. एस. इन्फोटेक कंपनीला देण्यात आला. मात्र नॅशनल हायवे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हे काम करताना नियम घाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप आदिवासी क्रांतीसेनेचे संस्थापक दिनेश जाधव यांनी केला आहे. याबाबत ते ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रारीचा पाढा वाचणार आहेत.

तहसीलदारांना अहवाल सादर

काळ नदी पात्रातील पाण्याचा उपसा कंत्राटदाराने केला आहे. याबाबत परवानगी घेण्यात आलेली नसून त्याबाबतचा अहवाल तहसीलदारांना सादर केल्याची माहिती न्याहाडीचे मंडळ अधिकारी जी. पवार यांनी दिली. दरम्यान आदिवासी क्रांतीसेनेचे जाधव यांनी काँक्रीटीकरण, पुलांची डागडुजी तसेच साईडपट्ट्यांची कामे करताना नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप केला आहे.

कंत्राटदारांचा दावा

महामार्गावरील मंजूर झालेल्या सर्व लहान-मोठ्या पुलांची कामे करण्यात आली आहेत. नियमानुसार सर्व कामे केली गेली आहेत.
– प्रदीप रॉय, लायजेनिंग मॅनेजर, आर. आर. एम.एस. इन्फोटेक

पूल नवीन उभारण्यात आले आहेत. तसेच काँक्रीटीकरणाबरोबरच काही पुलांची डागडुजी करण्यात आलेली आहे.
सुभाष पुनिया, अभियंता, इन्फोटेक

Comments are closed.