चार तास ऍम्ब्युलन्स न मिळाल्याने हॉस्पिटलच्या दारातच महिलेचा तडफडून मृत्यू

कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयामधून अत्यवस्थ अवस्थेतील सविता बिराजदार (43) यांना उपचारासाठी कळवा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येणार होते. मात्र तब्बल चार तास अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे या महिलेचा हॉस्पिटलच्या दारातच तडफडून मृत्यू झाला. आम्ही एका रुग्णासाठी रुग्णवाहिका देत नाही. किमान तीन-चार रुग्ण असतील तरच अॅम्ब्युलन्स मिळेल असे असंवेदनशील उत्तर रुग्णालय प्रशासनाने दिले. या घटनेने सरकारच्या आरोग्य व्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघालेत.

कल्याण खडेगोळवली परिसरातील रहिवासी सविता बिराजदार यांना आज दुपारी 12 वाजता अर्धांगवायूचा झटका आला. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी अर्धांगवायूसंबंधी उपचारांची सुविधा नसल्यामुळे त्यांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात हलवण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला. यानंतर बिराजदार कुटुंबीयांनी रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या पालिकेच्या अॅम्ब्युलन्सशी संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे 108 क्रमांकाच्या आपत्कालीन सेवेलाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. परिणामी अत्यवस्थ अवस्थेतील सविता यांचा मृत्यू झाला.

वेळेत उपचार मिळाले असते तर आई वाचली असती

आमच्या आईला वेळेत उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता. आरोग्य यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे माझी आई आज आम्हाला सोडून गेली. निर्ढावलेल्या दोषी प्रशासनावर कारवाई करावी, अशी मागणी सविता बिराजदार यांचा मुलगा रामदास याने केली आहे.

प्राथमिक तपासणीनंतर सविता बिराजदार यांना पुढील उपचारासाठी कळवा येथे पाठवण्याचा सल्ला दिला होता. अॅम्ब्युलन्स येईपर्यंत वाट पाहत असतानाच रुग्णाचा मृत्यू झाला. जो अॅम्ब्युलन्स चालक वा कर्मचारी दोषी आढळेल त्याच्यावर निश्चित कठोर कारवाई केली जाईल.
– डॉ. संदीप पगारे, रुक्मिणीबाई रुग्णालय

Comments are closed.