हिंदीत बोलल्याने मराठी तरुणांनीच केली मराठी विद्यार्थ्याला मारहाण, मानसिक तणावातून उचलले टोकाचे पाऊल

कल्याणमधील तिसगाव नाका येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणाला लोकल ट्रेनमध्ये हिंदीत बोलल्याने चार ते पाच मराठी तरुणांनी मारहाण केली होती. तेव्हापासून तो मानसिक तणावात होता.
अर्णव खैरे असे त्या तरुणाचे नाव असून तो कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका येथे राहायचा. अर्णव मुलुंड मधील एका कॉलेजमध्ये शिकत होता. तो दरोरज कल्याणवरून ट्रेनने मुलुंडला जायचा. काही दिवसांपूर्वी ट्रेनमध्ये अर्णवचा एका प्रवाशासोबत वाद झाला होता. त्यावेळी अर्णव हिंदीत त्यांच्याशी बोलत होता. त्यावेळी त्या प्रवाशाने अर्णवला मराठी येत नाही का? मराठीत बोलायची लाज वाटते का? असे विचारले. त्यांचा हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर त्या प्रवाशासोबत असलेल्या तरुणांनी अर्णवला बेदम मराहाण केली.
या मारहाणीमुळे अर्णव प्रचंड तणावाखाली होता. तो ट्रेनमधून प्रवास करायला घाबरायला लागला होता. त्याला त्या घटनेचा मानसिक धक्का बसला होता. या तणावातून त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Comments are closed.