मागून आला अन् मानेवर बंदूक ठेवली, गोळी फारुख अब्दुल्लांच्या डोक्यावरुन गेली; हादरवणारा VIDEO

फारुख अब्दुल्ला हल्ला : जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुदैवानं या हल्ल्यात फारूक अब्दुल्ला थोडक्यात बचावले आहेत. फारुख अब्दुल्ला बुधवारी (11 मार्च) जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका वकिलाच्या लग्नाला उपस्थित होते. लग्न समारंभ आटोपून जात असताना हल्लेखोर कमल सिंग जामवालने (Kamal Singh Jamwal) मागून फारुख अब्दुला यांच्या मानेवर बंदूक ठेवली. यादरम्यान, फारुख अब्दुला यांच्या सोबत असलेल्यांकडून हल्लेखोर कमल सिंग जामवालची धरपकड करण्यात आली.

फारुख अब्दुल्ला यांच्या मानेवर बंदूक ठेवणारा कमल सिंग जामवाल कोण? (Who Is Kamal Singh Jamwal)

फारुख अब्दुल्लावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. हल्लेखोराचे नाव कमल सिंग जामवाल आहे, तो जम्मूच्या पुरानी मंडी परिसरातील रहिवासी आहे. वृत्तानुसार, कमल सिंगचा जन्म 1963 मध्ये झाला होता. जम्मूच्या जुन्या शहर परिसरात त्याची अनेक दुकाने आहेत. या दुकानांच्या भाड्याने तो आपला उदरनिर्वाह करतो. आतापर्यंतच्या चौकशीत, आरोपीने उघड केले आहे की तो 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्लाला मारण्याचा विचार करत होता. तो म्हणाला, मी 20 वर्षांपासून फारुख अब्दुल्लाला मारू इच्छित होतो. हा माझा वैयक्तिक अजेंडा होता.

प्रत्यक्षदर्शींनी काय म्हटले? (Farooq Abdullah Attack)

लग्नात उपस्थित असलेले राकेश सिंग म्हणाले की ते नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या कायदेशीर सेल अध्यक्षांच्या मुलीचे लग्न होते. आम्ही सर्व एकत्र बसलो होतो. तेव्हा फारुख अब्दुल्ला म्हणाले, चला आता निघूया…आम्ही सर्वजण निघत असताना एका माणसाने येऊन फारुख अब्दुल्ला यांच्यावर बंदूक ठेवली. यावेळी गोळी फारुख अब्दुल्ला यांच्या डोक्याच्या वरुन निघून गेली.

नेमकं काय घडलं? (Firing On Farooq Abdullah)

फारूक अब्दुल्ला जम्मूमध्ये होते. त्यांच्या पक्षातील एका कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नासाठी ते बँक्वेट हॉलमध्ये आले होते. जवळपास एक तास ते समारंभात थांबले होते. मात्र समारंभातून बाहेर पडताच त्यांच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेच्या वेळी फारूक अब्दुल्ला यांच्यासोबत जम्मू-कश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी देखील उपस्थित होते. गोळीबारादरम्यान त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. या घटनेमुळं जम्मू परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित बातमी:

Farooq Abdullah Firing : माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांवर गोळीबार, जम्मूतील लग्न समारंभातून बाहेर पडताच हल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी जखमी

आणखी वाचा

Comments are closed.