मी संविधानाशी प्रामाणिक, ‘संघ’ कार्यक्रमाला जाणार नाही!कमलताई गवईंचा आरएसएसला ‘दे धक्का’

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धक्का दिला आहे. ‘मी आणि माझे घराणे संविधानाशी प्रामाणिक आहे’, असे ठणकावून सांगताना ‘अमरावतीत होणाऱ्या आरएसएसच्या विजयादशमी सोहळय़ाला मी जाणार नाही’, असे कमलताईंनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

संघाचा विजयादशमी सोहळा 5 ऑक्टोबर रोजी अमरावतीत नरसम्मा हिरय्या महाविद्यालयाच्या प्रांगणावर होणार आहे. या कार्यक्रमाला कमलताई गवई या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याच्या निमंत्रण पत्रिका समोर आल्या होत्या. याबाबत बातम्याही प्रसिद्ध झाल्या. त्याचा कमलताईंनी आज तीव्र शब्दांत समाचार घेतला. त्यांनी एक निवेदनच जारी केले आहे.

‘आरएसएसच्या विजयादशमी सोहळय़ाला मी उपस्थित राहणार असल्याची बातमी धादांत खोटी आहे. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत आणि देशाच्या संविधानाप्रती माझे घराणे अविरत प्रामाणिक आहे. त्यामुळे आरएसएसच्या अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमाला मी जाणार नाही. सामाजिक जाणिवेला कुठल्याही प्रकारे दुःख होऊ देणार नाही’, असे कमलताईंनी नमूद केले.

हे षड्‍यंत्र

महाराष्ट्र आणि देशभरातील जनतेने याची नोंद घ्यावी. विजयादशमी ही हिंदू संस्कृती असली तरी माझ्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी महत्त्वपूर्ण आहे. तेव्हा अपप्रचाराला बळी पडू नका. प्रकाशित बातमीचा मी निषेध व धिक्कार करते. तमाम आंबेडकरी जनतेने याची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवावा. माझा होकार न घेता हे करण्यात आलं. आरएसएसचं हे षड्यंत्र आहे. हे निमंत्रण मी स्वीकारलेले नाही, असे कमलताईंनी स्पष्ट केले.

ईव्हीएमविरोधात मांडली होती परखड भूमिका

ईव्हीएमबाबतही कमलताईंनी परखड भूमिका मांडली होती. ईव्हीएमबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निर्णय घेतला पाहिजे का, असे विचारले असता, ‘मी त्याची आई आहे. तो त्या खुर्चीत बसल्यावर त्याला योग्य वाटेल तो निर्णय घेईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदु मानलेले आहे. लोकांमधील एक व्यक्ती आणि एक सामान्य स्त्री म्हणून मी काय मत व्यक्त करणार, हे तुम्हाला माहीत आहे. परंतु तुमची इच्छाच असेल तर मी सांगते, मतपत्रिकेवर निवडणुका घेणे केव्हाही चांगले. यापूर्वीही मतपत्रिकेवरच निवडणुका व्हायच्या, असे कमलताई म्हणाल्या होत्या.

Comments are closed.