अल्पभूधारक शेतकरी किशनराव मंगनाळे यांचा विक्रम, सहाशे केशर आंब्याच्या झाडांची लागवड, साडेपाच लाखांचे उत्पन्न
>> गणेश कुंटेवार
कंधार तालुक्यातील पानशेवडी येथील अल्पभूधारक शेतकरी किशनराव मंगनाळे यांनी आपल्या शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार केशर आंब्याची बाग विकसित केली आहे. योग्य नियोजन, मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर कमी क्षेत्रातून ५ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. इतर शेतकर्यांपुढे त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या प्रयोगाला चांगले यश आले आहे.
तीन वर्षांपूर्वी किशनराव मंगनाळे यांनी एक बाय एक मीटर आकाराची खड्डे खोदून त्यात माती, शेणखत, रासायनिक खत व काळया मातीने खड्डे भरून घेतले. चंद्रकला नर्सरी मंठा येथून दर्जेदार रोपाची खरेदी केली. केशर आंबा लागवडीच्या वेळी दोन रोपातील योग्य अंतर ठेवून कलमे लागवड केली. बागेच्या वाढीसाठी ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला. तसेच संतुलित खत व्यवस्थापन, रासायनिक खताबरोबरच जैविक व सेंद्रिय खताचा वापर बागेसाठी केला.
बागेची चांगली वाढ होण्यासाठी नियमित छाटणी, तन नियंत्रण, कीड व रोग नियंत्रणासाठी वेळेवर रासायनिक व जैविक कीटकनाशके व बुरशी नकाशकाचा वापर ते करतात. कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार सूक्ष्म अन्नद्रव्य सेंद्रिय खताचा वापर करतात. त्यामुळे झाडांची चांगली वाढ झाली व फळाची गुणवत्ता सुद्धा चांगली मिळते. तसेच आपल्या संपूर्ण आंब्याच्या बागेला स्वखर्चाने तारेचे कुंपण केले.
आंबा लागवड करून तीन वर्षे पूर्ण झाले नाहीत तरी फळधारणा बागेत चांगले झालेली आहे. केशर आंब्याला चव आणि आकार चांगला असल्यामुळे या आंब्याला बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे किशनराव मंगनाळे यांनी सहाशे केशर आंब्यांच्या झाडांची लागवड केलेली आहे. त्यापासून त्यांना यावर्षी ५ लाख ५० हजार रुपयाला व्यापार्याला बाग विक्री केली आहे. यातून त्यांना पहिल्याच वर्षी चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
अल्पवधारक शेतकरी देखील योग्य नियोजन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि कृषी विभागाचा सल्ला या मेहनतीच्या जोरावर बागायती पिकातून चांगले उत्पन्न मिळू शकतात. याकामी त्यांना त्यांचे वडील उद्धवराव मंगनाळे व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती मिराबाई मंगनाळे यांची मोलाची साथ मिळाली आहे.
मी जुलै २०२४ यावर्षी आंब्याची कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून केशर आंबा पिकाची लागवड केली. मला वेळोवेळी पानशेवडीचे सहाय्यक कृषी अधिकारी संभाजी वडजे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे शेतकरी किशनराव मंगनाळे यांनी सांगितले.
शेतकर्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा. तसेच शाश्वत उत्पन्न घेऊन स्वतःची आर्थिक प्रगती साधावी, असे सहायक कृषी अधिकारी संभाजी वडजे यांनी सांगितले.
Comments are closed.