घरातील कार्यक्रमात दारू पिऊन धिंगाणा घातल्याने भावानेच दिली भावाच्या हत्येची सुपारी

कांजुर मार्ग येथील मेट्रो कारशेडजवळ मृतावस्थेत सापडलेल्या राजेश सारवान यांच्या हत्येचा उलगडा अखेर झाला. दारू पिऊन घरच्यांना प्रचंड त्रास देतो. त्यामुळे त्रासलेल्या चुलत भावानेच तीन लाखांची सुपारी देऊन त्यांची हत्या केली. याप्रकरणी गुन्हे शाखेने दोघा मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

17 जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कांजुर मार्ग येथील मेट्रो कारशेडजवळील सर्व्हिस रोड नजीक राजेश सारवान( 41) यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांची डोक्यात जड वस्तूने मारहाण करून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. कांजुरमार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला होता. गुन्हे शाखेची विविध पथके या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. अखेर पोलिसांनी राजेश यांची हत्या करणारे राजेश चंडालिया आणि राजेश पिवाळ अशा दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबूली दिली.

मृत राजेशचा चुलत भाऊ विजय सारवान (30) याने त्याच्या हत्येसाठी तीन लाखांची सुपारी दिली होती. त्यापैकी 50 हजाराची आगाऊ रक्कम विजयने देऊ केली होती असे मारेकऱ्यांनी सांगितले. राजेश दारू पिऊन प्रचंड त्रास द्यायचा. त्यांच्या हत्येच्या 18 तास आधी एका घरगुती कार्यक्रमात राजेशने धिंगाना घातला होता. त्यामुळे संतापलेल्या विजयने हत्येची सुपारी दिली होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले.‌ दरम्यान विजयला कांजूर मार्ग पोलिसांनी पकडल्याचे समजते.

Comments are closed.