मोबाईलवर कपड्यांची डिझाईन पाहणाऱ्या बायकोला नवऱ्याने वीट फेकून मारली

सतत मोबाईल बघत असलेल्या पत्नीला माथेफिरू पतीने वीट फेकून मारल्याची घटना कर्जतच्या तळ्याची वाडी परिसरात घडली. पत्नी मोबाईलच्या स्क्रीनवर कपड्यांची डिझाईन पाहत असल्याने दोघांमध्ये वाद झाला. केवळ मोबाईलमुळे पती-पत्नीच्या सुखी संसारात बिब्बा पडला आणि संतापलेल्या पतीने तिला मारहाण केली. या हल्ल्यात पत्नी जखमी झाली असून तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी माथेफिरू नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मोबाईलने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना कर्जतमध्येदेखील घडली. कडाव येथील तळ्याची वाडी येथे राहणारे दाम्पत्य सुखाने नांदत होते. मात्र पत्नी मोबाईलमध्ये सतत कपड्यांचे डिझाईन बघत असल्याने पती संतापला. त्याने तिला टोकले आणि सारखी मोबाईल का बघत असते असा जाब विचारला. त्यावर पत्नीने उलट उत्तर देत ‘तुम्ही पण रात्रभर मोबाईल बघत बसता. थोडा वेळ बघितलं तर काय झाले, थोडा वेळ डिझाईन बघू द्या’ असे सांगितले. तिचे उलट उत्तर ऐकून पतीचा पारा चढला आणि त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावर त्यांच्यात बाचाबाची झाली आणि राग अनावर झालेल्या पतीने बायकोला घरातील पायरीवर ठेवलेली वीट फेकून मारली.
थोडक्यात बचावली
माथेफिरू पतीने केलेल्या हल्ल्यात पत्नी थोडक्यात बचावली असली तरी तिला दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या पत्नीने पतीला धडा शिकवण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी पतीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही

Comments are closed.