कर्जतमध्ये विकासाचा भोपळा; लाखोंचा चुराडा करूनही घागर उताणीच, भरपावसात हंडाभर पाण्यासाठी पायपीट

कर्जत तालुक्यातील भोपळेवाडी या आदिवासी पाड्यात भरपावसात हंडाभर पाण्यासाठी महिलांची डोंगर ‘झऱ्यात’ पायपीट सुरू आहे. पाण्यासाठी लाखोंचा चुराडा करूनही विकासाचा भोपळा फुटलेला नाही. आदिवासी पाड्यावर पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असून घागर उताणीच आहे. ग्रामस्थांना आजही कोसो दूर निसरड्या डोंगर पायवाटा चढून झरे व डवऱ्यातून पाणी आणावे लागत असल्याचे भयाण वास्तव आहे.

केंद्र शासनाची जलजीवन योजना ग्रामीण भागातील महिलांचा डोक्यावरील हंडा खाली उतरेल या हेतूने आहे. परंतु कर्जत तालुक्यात आजही या जलजीवन योजनेचे काम रखडलेले आहे. काही ठिकाणी योजना पूर्ण झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते परंतु जिथे योजना पूर्णत्वास गेली आहे तिथे नळाला थेंबभरसुद्धा पाणी नाही. भोपळेवाडीत हिवाळी, उन्हाळी, पावसाळ्यातही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. जलजीवन योजना कागदोपत्री पूर्ण झाल्या, पण प्रत्यक्षात नळ कोरडे आहेत. घराजवळ पाइपलाइन आणून ठेवली आहे. परंतु आमचा घसा कोरडाच असल्याची कैफियत महिलांनी मांडली.

तीन वर्षापासून वीज नाही

भोपळेवाडी या गावात जलजीवन योजनेंतर्गत नळ तर आले पण नळांना पाणीच नाही. पाणी योजनेसाठी वीज जोडणीच दिलेली नाही. ग्रामस्थांनी ठेकेदार, जिल्हा परिषद, महावितरणकडे तीन वर्षांपासून पाठपुरावा करूनही मीटरच मिळाले नाही. परिणामी मोटर सुरू होत नसल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे.

विंचू, सापाचा धोका

महिलांच्या डोक्यावर हंडे, हातात घागरी घेऊन पाण्याची धडपड सुरू आहे. जंगल भागातून पाणी आणताना साप, विंचू यांचा धोका कायम असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. पावसाळ्यात पाऊस पडत असला तरी पिण्यासाठी पुन्हा झरे, डक्ऱ्यांचे गढूळ पाणी गाळून घ्यावे लागते.

Comments are closed.