कर्नाटक हे गुंतवणूकीसाठी परिपूर्ण राज्य आहे

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन : बेंगळूरमध्ये ‘इन्व्हेस्ट कर्नाटक-2025’चे उद्घाटन

प्रतिनिधी/ बेंगळूर

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि उत्तम वातावरण असणारे कर्नाटक हे भांडवल गुंतवणुकीसाठी परिपूर्ण राज्य आहे. येथे गुंतवणूक केली तर संपूर्ण देश  गुंतवणूकदारांच्या पाठिशी उभा राहिल, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. भारताच्या भविष्याबद्दल शंका असणाऱ्यांनी एकदा बेंगळूरला येऊन येथील आयटी, स्टार्टअप्स आणि इतर क्रांतिकारी संशोधन पाहिल्यास सर्व शंका दूर होतील, असेही ते म्हणाले.

बेंगळूरमध्ये ‘इन्व्हेस्ट कर्नाटक-2025’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे मंगळवारी राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी ते म्हणाले, कर्नाटक हे ज्ञान आणि संपत्ती या दोहोंचा मिलाफ असणारे राज्य आहे. देशातील आयटी राजधानी असलेले बेंगळूर हे अंतराळ, कृत्रिम बुद्धीमत्ता, प्रतिभा आणि युवा वर्गाचे पसंतीचे केंद्र आहे. येथील क्षमता, महत्त्वाकांक्षा आणि येथील महत्त्वपूर्व योगदान देशाला अधिक उंचीवर घेऊन जात आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रातील पहिला मॉडेल देखील येथून लवकरच प्रसिद्ध केला जाईल. याला येथील उपलब्ध मनुष्यबळ आणि प्रतिभा कारणीभूत ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

केवळ बाजार-आधारित अर्थव्यवस्थाच शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण करू शकते. हे शक्य होण्यासाठी खासगी उद्योजक खूप महत्वाचे आहेत. गुंतवणूकदारांना पूर्वी लाल फितीचा सामना करावा लागत होता, पण आता त्यांचे स्वागत रेड कार्पेटवर होत आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनत आहे. त्यानुसार, सरकारकडून महत्त्वाचे निर्णयही घेतले जात आहेत. बेंगळूरच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे अवकाश क्षेत्रात भारत असाधारण कामगिरी करत आहे, असे गौरवोद्गारही राजनाथ सिंह यांनी काढले.

सुधारित सिंगल विंडो प्रणालीचे अनावरण

गुंतवणूकदार परिषद उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उद्योगांना जलद मंजुरी देण्यास अनुकूल आणि उद्योगांशी संबंधित 30 हून अधिक खात्यांच्या 150 सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या सुधारित सिंगल विंडो पोर्टलचे अनावरण केले. मायक्रोसॉफ्टच्या मदतीने विकसित केलेली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली ही प्रणाली औद्योगिक प्रकल्पांशी संबंधीत मंजुरी, नूतनीकरण, दुरुस्ती, त्रुटींचे निवारण करण्यास अनुकूल ठरणार आहे. शिवाय केंद्र सरकार स्तरावरील विविध सेवा देगील याद्वारे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय मिळतील.

5 हजारहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित

जागतिक गुंतवणूकदार परिषदेला 5,000 हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच अनेक देशांचे राजदूत उपस्थित होते. यामध्ये बहरीनचे राजदूत मोहम्मद अल गावद, क्युबाचे अबेल अबाल डेस्पेन, इटलीचे अँटोनियो बार्टोली, नेपाळचे डॉ. शंकर प्रसाद शर्मा, पोलंडचे सेबास्टियन डॉमझाल्स्की, मलेशियाचे दातो मजफ्फर शाह मुस्तफा, जपानचे ओनो किची, काँगोचे रेमंड सर्ज बेल, जमैकाचे जेसन हॉल, फिजीचे जगन्नाथ स्वामी, जमैकाचे जेसन हॉल, कझाकस्तानचे नुऊलन झल्गसबायेव, मोरोक्कोचे मोहम्मद मालिकी, सेशेल्सचे ललाटियाना अकोउच, ताजिकिस्तानचे लुकमान बोबकालोझोदा आणि झिम्बाब्वेच्या स्टेला नोमो यांचा समावेश आहे.

नामवंत उद्योजकांची उपस्थिती

नामवंत उद्योजक आनंद महिंद्रा, सज्जन जिंदाल, किरण मुझुमदार शॉ, गीतांजली किर्लोस्कर, राहुल बजाज, शेष वरदराजन, प्रशांत प्रकाश आदी उद्योजकांनीही गुंतवणूकदार परिषदेत सहभाग घेतला. त्यांचे राज्याचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी स्वागत केले.

मंत्र्यांची उपस्थिती

गुंतवणूकदार परिषदेच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, प्रल्हाद जोशी, राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, मंत्री के. जे. जॉर्ज, प्रियांक खर्गे, भैरती सुरेश, डॉ, शरणप्रकाश पाटील, शिवानंद पाटील, कृष्णभैरेगौडा, एस. सी. महादेवप्पा, एम. सी. सुधाकर हे देखील उपस्थित होते.

महिंद्रा ग्रुपकडून 40 हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा

उद्योजक आनंद महिंद्रा यांनी पुढील पाच वर्षात कर्नाटकात विविध क्षेत्रात 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली. पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा, पर्यटन, अवकाश आणि संरक्षण, इलेक्ट्रिक तीनचाकी वाहननिर्मिती आणि रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येईल. महिंद्रा समुहाने बेंगळूरमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या 5 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. येत्या काही दिवसांत 6 हजार कोटी रु. गुंतवणूक केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

1 लाख कोटींची गुंतवणूक : सज्जन जिंदाल

आपल्या नेतृत्त्वाखाली जिंदाल समूह कर्नाटकात आगामी काळात एकूण 1 लाख कोटींपेक्षा अधिक भांडवल गुंतवणूक करणार आहे. यापैकी 45 हजार कोटी रु. स्टील उत्पादन क्षेत्रात आणि हॉटेल, सौरऊर्जा, पर्यावरणपूरक इंधन आणि ग्रीन हायड्रोजन क्षेत्रात 56 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे, अशी घोषणा उद्योजक सज्जन जिंदाल यांनी केली.

Comments are closed.