Karni Mata Mandir : येथे होते उंदरांची पूजा

आपल्या देशात अनेक मंदिरे आहेत. प्रत्येकाची ओळख ही अनोखी असून माहात्म देखील वेगळं आहे. आज आपण अशाच एका मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत, जे उंदरांमुळे ओळखले जाते. राजस्थानमधील बिकानेर येथे असलेले करणी माता मंदिर उंदरांमुळे प्रसिद्ध आहे. या मंदिरात हजारो उंदीर आहेत, ज्यामुळे ते आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

उंदिरांचे नाव ऐकताच अनेक जणांची भंबेरी उडते खरं.. पण, या मंदिरातील उंदरांची पूजा केली जाते. हे उंदरांचे मंदिर बिकानेरपासून अवघ्या 30 किमी अंतरावर असलेल्या देशनोक शहरात आहे. या मंदिरात उंदीर अगदी मुक्तपणे संचार करतात. येथे उंदरांना ‘काबा’ असे देखील संबाधले जाते.

मंदिराची स्थापना-

असे म्हणतात की, करणी माता बिकानेर राजघराण्याची कुलदेवता आहे. याच देवीच्या आशीर्वादाने बीकानेर आणि जोधपूर या संस्थानाची स्थापना झाली असे सांगितले जाते.

मंदिराचे बांधकाम –

करणी माता मंदिर हे पारंपारिक राजस्थानी शैलीचे एक सुंदर उदाहरण आहे. मंदिराचा पुढील भाग जटिल संगमरवरी कोरीव कामांनी सुशोभित केलेला आहे आणि विविध देवता, पौराणिक आकृती दर्शविणारे आकर्षक चांदीचे दरवाजे मंदिराला आहेत. आतील गाभाऱ्यात करणी मातेची मूर्ती आहे, जी रेशमी वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजलेली आहे.

सोन्याचा उंदीर –

या मंदिराचे वेगळेपण सांगायचे झाल्यास या मंदिरात उंदरांवर पाय पडू नये यासाठी पाय ओढत चालावे लागते.  जर चुकून तुमचा उंदरावर पाय पडला आणि उंदीर मरण पावला किंवा त्याला जखम झाली तर शिक्षा म्हणून येथे तुम्हाला सोन्याचा उंदीर बनवून अर्पण करावा लागतो.

मंदिराची आख्यायिका –

धार्मिक मान्यतेनुसार, हे मंदिर देवी दुर्गेचा अवतार करणी मातेच्या सन्मानार्थ बांधले गेले होते. या मागची आख्यायीका अशी सांगितली जाते की, करणी मातेचा मुलगा लक्ष्मण कपिल सरोवरात मद्यपान करत असताना बुडाला. त्यानंतर करणी माता तिच्या मुलाला पुन्हा जिवंत करण्यासाठी यमाकडे गेली. जेव्हा यमाने नकार दिला तेव्हा करणी मातेने लक्ष्मण आणि त्याच्या 4000 वंशजांना उंदीर म्हणून पुनर्जन्म दिला. तेच हे उंदीर.. असे मानले जाते.

उंदराचा उष्टा प्रसाद –

या मंदिरात पांढरा उंदीर दिसणे शुभ मानले जाते. मंदिरात सकाळी आणि रात्री आरतीच्या वेळी सर्व उंदीर बिळातून बाहेर येतात आणि देवीला नैवैद्य देण्याआधी उंदीर खातात. उंदरांनी नैवेद्य खाल्ल्यानंतर नैवेद्य प्रसाद म्हणून देण्यात येतो. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रसाद खाऊन आजपर्यंत या उंदरांमुळे कोणीही आजार पडलेलं नाही.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=xax86ybucla

Comments are closed.