IND vs ENG: करुणला अजून एक संधी, युवा गोलंदाजाचं पदार्पण, आकाश चोप्राने निवडली भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
लॉर्ड्समधील पराभवानंतर भारतीय संघात खळबळ उडाली आहे. प्रशिक्षकांपासून ते कर्णधारापर्यंत सर्वजण मालिकेत परतण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात व्यस्त आहेत. इंग्लंड सध्या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीत पराभव झाल्यानंतर भारताच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतत अपयशी ठरत असलेल्या करुण नायरवर (Karun Nair) कारवाई होणं निश्चित मानलं जात आहे.
पण भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopda) यांचं मत थोडं वेगळं आहे. त्यांनी चौथ्या कसोटी सामन्यासाठी स्वतःची भारतीय प्लेइंग 11 जाहीर केली असून त्यामध्ये करुण नायरला अजून एक संधी दिली आहे.
आकाश चोप्रांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग 11 जाहीर केली आहे. त्यांनी सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) आणि केएल राहुलची (KL Rahul) निवड केली आहे. हे दोघंही या मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आकाश चोप्रांनी करुण नायरवर विश्वास दाखवला आहे. करुणने या मालिकेतील तीन कसोटींमध्ये एकही अर्धशतक झळकावलेलं नाही आणि त्याची सर्वोत्तम खेळी 40 आहे. चौथ्या क्रमांकावर कर्णधार शुबमन गिलला (Shubman gill) जबाबदारी देण्यात आली आहे.
विकेटकीपर म्हणून आकाश चोप्रांनी रिषभ पंत (Rishbh Pant) आणि ध्रुव जुरेल (Dhruv jurel) दोघांना संघात स्थान दिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, पंत केवळ फलंदाज म्हणूनसुद्धा खेळला तरीही त्याला संघात ठेवावं लागेल.
आकाश चोप्रांच्या निवडीत दोन फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar). जडेजाने तिसऱ्या कसोटीत चांगली फलंदाजी केली होती. मात्र कुलदीप यादवला (Kuldeep yadav) संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
या संघात तीन वेगवान गोलंदाज आहेत. आकाश चोप्रांच्या म्हणण्यानुसार चौथ्या कसोटीत जसप्रीत बुमराह खेळणार आणि त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. बुमराहच्या जोडीला मोहम्मद सिराजला योग्य पर्याय मानलं आहे. तसेच, जर आकाशदीप पूर्णपणे तंदुरुस्त नसेल, तर त्यांच्या जागी अंशुल कंबोजला अंतिम 11 मध्ये स्थान द्यावं अशी आकाश चोप्राची इच्छा आहे.
आकाश चोप्रा यांची प्लेइंग 11
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल, रिषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज
Comments are closed.