शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात धनंजय मुंडेंच्या गुंडांचा हात, करुणा शर्मा यांचा आरोप

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गुंडांचा हात आहे, असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे. सगळ्या गुन्हांना धनंजय मुंडे पोसत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

माध्यमांशी सावध साधताना करुणा शर्मा म्हणाल्या आहेत की, “माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, या गुंडांवर मकोका न लावता ऑपरेशन सिंदूरप्रमाणे यांच्यावर कारवाई करावी.” त्या म्हणाल्या की, “आठ लोक मिळून एकाला मारत आहेत. या आठ लोकांवर जरी मकोका लावून कारवाई केली तरी, त्यांच्याकडे 8 हजार लोक आणखी तयार आहेत. प्रशासन हेच काम करत राहणार का? या पेक्षा त्यांच्यावर ऑपरेशन सिंदूरप्रमाणे कारवाई करा.”

करुणा शर्मा म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्याकडे कमीत कमी 10 हजार गुंड आहेत. बीडमध्ये फक्त धनंजय मुंडे यांचं शासन चालतं आणि येथील गुंडगिरी वाढण्यासाठी धनंजय मुंडे जबाबदार आहेत, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, परळी येथे शुक्रवारी सायंकाळी शिवराज दिवटे या तरुणाला गुंडांच्या टोळीकडून बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या टोळक्याने शिवराज दिवटेचे अपहरण करून त्याला डोंगरदऱ्यात नेऊन मारहाण केली. ‘तुझाही संतोष देशमुख करू’ अशी धमकी या टोळक्याने दिल्याचे शिवराजने सांगितले. दरम्यान, या प्रकरणी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Comments are closed.