लोकलमध्ये जागा अडवण्यावरून राडा, दोन्ही सीट आमच्या.. काय करायचंय ते करा ! ग्रुपने प्रवास करणाऱ्यांची मुजोरी

लोकल ट्रेनमध्ये ग्रुपने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. कसाऱ्याहून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलमध्ये एका ग्रुपमधील प्रवाशाने खिडकीजवळ असलेल्या सीटवर बॅगा ठेवून इतर प्रवाशांना बसण्यास मज्जाव केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी मुजोर प्रवाशाने या दोन्ही सीट आमच्या आहेत.. काय करायचे ते करा.. अशी दादागिरी केल्याने लोकलच्या डब्यात प्रचंड हमरातुमरी झाली. या मुजोर प्रवाशाचा व्हिडीओ एका प्रवाशाने शूट करून समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे.
कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने पहाटे 6.10 च्या दरम्यान लोकल सुटणार होती. यावेळी रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या एका ग्रुपमधील प्रवाशाने सीट राखून ठेवण्यासाठी सीटवर बॅगा ठेवत जागा अडवल्या व तो खिडकीजवळ बसला. यावेळी डब्यात चढलेल्या इतर प्रवाशांनी ‘बॅगा काढा आम्हाला बसायचे आहे’ असे सांगताच ‘आमची माणसे येणार आहेत, या दोन्ही सीट आमच्या आहेत, तुम्हाला काय करायचे ते करा’ अशी मुजोरी केली. त्यामुळे अन्य प्रवासी संतप्त झाले. त्यांनी जाब विचारताच दोन गटात प्रचंड गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ मोबाईल मध्ये शूट करून समाजमाध्यमांवर व्हायरल केला.
दादागिरी करणाऱ्यांवर कारवाई करा !
सकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या गोंधळामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ग्रुपने प्रवास करणारी माणसे दादागिरी करत जागा अडवतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. त्यामुळे लोकलमध्ये गटबाजी व दादागिरी करणाऱ्या मुजोर प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
Comments are closed.