काशी विश्वनाथ मंदिर याजकांनी राज्य कर्मचार्‍यांचा दर्जा दिला

वेतन 3 पट वाढणार : नवी सेवा नियमावली लागू

वृत्तसंस्था/ वाराणसी

काशी विश्वनाथ मंदिरात 40 वर्षांनंतर कर्मचारी सेवा नियमावलीला न्यासाने मंजुरी दिली आहे. नव्या नियमावलीच्या अंतर्गत न्यासाच्या कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्याचा दर्जा प्राप्त होणार आहे. यामुळे मंदिराचे कर्मचारी आणि अर्चकांचे वेतन तीनपट वाढणार आहे. श्रीकाशी विश्वनाथ मंदिर न्यास परिषदेच्या 108 व्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त एस. राजलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचारी सेवा नियमावली समवेत सुमारे 24 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पुजाऱ्यांना सध्या 30 हजार रुपयांचे वेतन मिळायचे, आता त्यांना 80-90 हजार रुपयांचे वेतन मिळू लागणार असल्याचे राजलिंगम यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनुसार नियमावली लागू झाल्यावर वेतन भत्त्यात वाढ होण्यासह पदोन्नती, सुट्यांसह अन्य सुविधाही मिळणार आहेत. पुजारी, कर्मचारी आणि सेवादारांच्या नियुक्तीसाठी प्रस्तावित नियमावलीत 4 श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पुजाऱ्यांना ग्रेड आणि मॅट्रिक्स देण्यात येणार आहे.

श्रीकाशी विश्वनाथ मंदिराचे राज्य सरकारकडून 1983 मध्ये अधिग्रहण करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत सेवा नियमावली लागू झालेली नव्हती. अनेकदा यासंबंधी प्रयत्न झाले, परंतु ते यशस्वी होऊ शकले नव्हते. राज्यघटनेच्या अनुच्छेद 201 अंतर्गत 1983 साली काशी विश्वनाथ मंदिर कायदा लागू करण्यात आला.

विशालाक्षी कॉरिडॉर

भाविकांना सुलभपणे ये-जा करता यावी म्हणून विशालाक्षी माता मंदिरापर्यंत कॉरिडॉर निर्माण होणार आहे.  संगम तीर्थ जल आदान-प्रदान योजनेलाही मंजुरी देण्यात आली, ज्यात सर्व ज्योतिर्लिंगांना योजनेशी जोडले जाणार आहे. तर मंदिर न्यास मिर्झापूर येथील स्वत:ची भूमी वैदिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेसाठी राज्य सरकारला देणार आहे. याचबरोबर काशी विश्वनाथ मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी नियंत्रण कक्ष आणि कॅमेऱ्यांचे आधुनिकीकरण तसच अपग्रेडेशन होणार आहे. संकटहरण हनुमान मंदिर परिसरात गोशाळेचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.

Comments are closed.