काश्मीर ते कन्याकुमारी 'शताब्दी ध्वज यात्रा' सुरू

श्रीनगर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ‘शतक ध्वज यात्रा’ची सुरुवात ऐतिहासिक आणि भावनिक वातावरणात झाली. या यात्रेचा शुभारंभ श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौक येथे झाला, जिथे स्वातंत्र्यानंतर प्रथमच अभिमानाने भगवा ध्वज फडकविण्यात आला. ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने यात्रेत सहभाग नोंदवत ऐक्याचा प्रभावी क्षण अनुभवला. जम्मूमध्ये यात्रेचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत झाले. डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि पूजनीय गोलवलकर गुरुजी यांच्या नेतृत्वाखालील संघाच्या शंभर वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासातून स्फूर्ती घेत सेवा, शिस्त आणि एकतेचा संदेश पुढे नेण्यात आला.

यात्रेचा पहिला टप्पा लुधियानामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात 100 दुचाकीस्वारांची भव्य रॅली काढण्यात आली, जी संघाच्या 100 वर्षांचे प्रतीक होती. त्यानंतर समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. याप्रसंगी बोलताना संघ कार्यकर्ते आणि निर्माते वीर कपूर म्हणाले, लाल चौक येथे ‘वंदे मातरम्’च्या घोषणांसह स्वातंत्र्यानंतर पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकवून ‘शतक ध्वज यात्रा’ची सुरुवात करणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण होता. ‘शतक’ या चित्रपटाच्या माध्यमातून आणि विविध शहरांमधील या यात्रेद्वारे आम्ही संघाच्या शंभर वर्षांच्या सेवाभावी प्रवासाचा आणि देशाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या एकतेचा उत्सव साजरा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. वीर कपूर निर्मित, पॅनोरमा स्टुडिओच्या सहकार्याने साकारलेला, आशिष तिवारी सह-निर्मित आणि आशिष मल्ल दिग्दर्शित ‘शतक: संघाची 100 वर्षे’ हा चित्रपट 19 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments are closed.