कटारा खून प्रकरणात आरोपीच्या जामीन विस्ताराने नकार दिला
सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2002 च्या प्रसिद्ध नितीश कटारा हत्याकांडात दोषी ठरलेल्या विकास यादवचा अंतरिम जामीन वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. यादव या प्रकरणात 25 वर्षांची शिक्षा भोगत आहे. विकास यादवला त्याच्या आईच्या आजाराच्या आधारावर अंतरिम जामीन मिळाल्यानंतर लग्नासाठी अंतरिम जामीन वाढवण्याची विनंती करण्यात आली. जामिनाच्या कालावधीत विकासने विवाह केल्यामुळे त्याच आधारावर जामीन कालावधी वाढवण्याची विनंती करण्यात आली होती.
न्यायाधीश एम. एम. सुंदरेश यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यादवच्या वकिलाला जामीन मुदतवाढ किंवा नवीन अंतरिम जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयानेच त्यांच्या याचिकेवर सुनावणी करावी अशी विनंती केली. मात्र, खंडपीठाने याचिका फेटाळत असल्याचे सूचित केले तेव्हा यादवच्या वकिलाने उच्च न्यायालयात अर्ज करण्याची तयारी दर्शवली. त्यांची ही बाब सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.
यापूर्वी खंडपीठाने यादवचा अंतरिम जामीन एका आठवड्यासाठी वाढवला होता. दिल्ली उच्च न्यायालयाच्या 22 ऑगस्टच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या यादव याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. उच्च न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन वाढविण्यास नकार दिला होता, तर सर्वोच्च न्यायालयाने 29 जुलै रोजी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता.
Comments are closed.