कुटुंबाला सहा लाखांची भरपाई द्या; न्यायालयाचे केडीएमसीला आदेश, नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

उघड्या झाकणामुळे नाल्यात पडून आयुष कदम या 14 वर्षीय मुलाचा मृत्यू गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झाला होता. याप्रकरणी त्याच्या कुटुंबाला सहा लाख रुपयांची नुकसानभरपाई द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला दिली आहे. त्यामुळे केडीएमसी प्रशासनाला सणसणीत चपराक बसली असून हलगर्जीपणाही उघड झाला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक गटारे व नाले उघडे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्घटना होतात. डोंबिवलीत राहणारा आयुष कदम याचा गेल्या वर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात नाल्यामध्ये पडून मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन सुमोटो दाखल केला. त्याच्या मृत्यूला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी व नातेवाईकांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने केडीएमसी प्रशासनावर ताशेरे ओढत सहा लाख रुपये नातेवाईकांना नुकसानभरपाईपोटी देण्याचे आदेश दिले आहेत.
झाकण नसल्याने गेला जीव
आयुष कदम हा स्वामी विवेकानंद शाळेत सातवीमध्ये शिकत होता. त्याचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. नाल्यावर झाकण नसल्यामुळे त्याचा तोल जाऊन मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी केडीएमसीने अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. मलनिःसारण विभागाचे उपअभियंता लीलाधर नारखेडे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Comments are closed.