BLOG : स्त्रियांच्या वाढत्या अमानुष आक्रमकतेचे सामाजिक मौन!
स्त्रियांनी केलेल्या हत्या आणि खून ह्याविषयी सोशल मीडियामध्ये तितका आक्रोश दिसत नाही जितका तो पुरुषांनी केलेल्या हत्या आणि अत्याचाराबद्दल दिसतो. तद्वतच एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या हत्येत केलेली मदत जसे की हुंडा बळी, अनैतिक संबंध, ब्लॅकमेलिंग इत्यादि घटनांतदेखील समाजाचा आक्रोश पुरुष अपराध्याबद्दल अधिक असतो, तुलनेने अपराधी स्त्रीविषयी तितका संताप दिसत नाही. मागील दशकात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यात नवविवाहित स्त्रियांनी अतिशय निर्दयतेने आपल्या पतीचा काटा काढला आणि वर त्याच्या संपत्तीवर डोळा ठेवला. अनेक महिलांनी बाह्य अफेअरपायी आपल्या नवऱ्याला अमानुषपणे मारलेय, अनेक स्त्रियांनी विलक्षण थंडपणे आपल्याच सुनेला भावजयीला जाऊबाईला मृत्यूच्या हवाली केलेय. अनेक गर्लफ्रेण्ड्सनी आपल्या बॉयफ्रेण्डची हत्या केलीय.
स्त्री कठोर हृदयाची मारेकरी असूच शकत नाही, ती सराईत गुन्हेगार असणाऱ्या पुरुषांसारखी असूच शकत नाही असं आपल्या समाजाला वाटत असेल का? एकेकाळी हे पूर्णसत्य असेलही मात्र अलीकडील काळातल्या घटना पाहू जाता हा समज अर्धसत्य असावा असे वाटू लागलेय. वरती दिलेले माझे निष्कर्ष चुकले असतील तर माझ्याइतका आनंद कुणालाच होणार नाही. कारण अनेक स्त्रियांच्या आयुष्याची राखरांगोळी कशी झाली आहे आणि ती अजूनही कशी जारी आहे हे मी डोळसपणे पाहिले आहे.
सिया गोयलला मुलगा पसंत नव्हता तर तिचे लग्न बळजबरीने ठरवणाऱ्या पालकांचा बुरखा तिने फाडला असता तर ते बरे दिसले असते मात्र ज्याने आपल्यासोबत लग्न करावे म्हणून जबरदस्ती केलेली नाही त्या वाग्दत्त वराची अमानुष हत्या करणे कधीही समर्थनीय नाही. अत्याचार करणाऱ्याचे जेंडर पाहून त्याच्या विरोधात व्यक्त न होणे ही वृत्ती आणि गुन्हेगाराची अपराध्याची जात पाहून त्याचे छुपे समर्थन करण्याची वृत्ती एकसारखीच मानली पाहिजे. आपण काही लिहिलं की, तुम्ही ह्याच्यावर लिहिलं पण त्याच्यावर लिहिलं नाही हे तुणतुणे वाजवणारे भामटे स्वतः कायम एकतर्फी आणि एकांगी असतात, ते देखील ह्याच कॅटेगरीत मोडतात. स्वतः निपक्षपाती असणाऱ्यांनीच इतरांना शहाणपणा शिकवावा असा नियम केल्यास सोशल मीडियावरची निम्मी अकाउंट्स बंद पडतील. असो.
अत्याचार करणारा, खून करणारा व्यक्ती कोणत्याही जातीधर्माचा, भाषेचा, प्रांताचा, जेंडरचा असो त्याचा समान निषेध करता आला पाहिजे. आजवर असंख्य पुरुषांनी अगणित स्त्रियांवर अनन्वित निर्घृण अत्याचार केलेले आहेत, आजही करताहेत आणि कदाचित भविष्यात देखील हे प्रमाण असेच असू शकते हे जळजळीत सत्य नाकारणारा माणूस स्वतःचीच फसवणूक करतो; मात्र त्याचवेळी हे ही मान्य केले पाहिजे की आताशा ह्या चित्रात किंचित बदल दिसू लागलाय, जी बाजू आजवरच्या काळात कधीही दागदार नव्हती तिच्यावरही आता बारीक सारीक लालभडक शिंतोडे उडू लागलेत. समाजातली सर्वस्तरीय वीण उसवत असतानाच, लैंगिक स्वातंत्र्य आणि स्वैराचार ह्यातली रेषा धूसर होत असताना आणि व्यक्तिगत हक्काच्या जाणिवा ठळक होत असतानाच्या काळातच हा बदल का घडतोय ह्याचाही मागोवा घेतला जाणे अपेक्षित आहे! असो.
अशा घटनांच्या काही नोंदी –
2001मध्ये महिलांकडून गुन्ह्यांचे प्रमाण IPC गुन्ह्यांमध्ये सुमारे 5.4% होते, ते 2011 पर्यंत 6.2% झाले. एकूण अटक झालेल्या महिलांची संख्या 1.44 लाखांवरून 1.93 लाखांपर्यंत वाढली. हे प्रमाण अजूनही पुरुषांच्या तुलनेत खूप कमी आहे (सुमारे 20:1चे प्रमाण), पण वाढ स्पष्ट आहे.
2005 मध्ये 3439 महिलांना खुनासाठी अटक, 2007 मध्ये 3812 महिलांना अटक, 2009 मध्ये 4007 जणी अटकेत! महिलांचा खुनातला सहभाग 5.4 % वरून 6.4 % पर्यंत वाढला. जीवे मारण्याच्या गुन्ह्यात महिला सहभागी असण्यात वाढ (2.6% ते 4.2%)
चोरी, दगाबाजी, हुंडा-संबंधित गुन्हे, घरगुती हिंसा, दारू/मादक पदार्थांची तस्करी, दंगल, इ. मध्ये सामील असण्याच्या टक्केवारीतही वाढ. महिलांचा सहभाग असणारे गुन्हे पूर्वी ‘सॉफ्ट’ टाइपचेच जसे तस्करी, अधिक होते. आता मात्र हिंसक आणि संघटीत गुन्ह्यांकडेही महिला वळल्या असल्याचे दिसते.
महिलांचा गुन्हेगारीचा वाटा अजूनही लहान आहे, पण गुणवत्ता आणि हिंसक स्वरूप बदलत आहे.
2020 पर्यंतच्या डेटानुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत महिलांची अटक 10 % वाढली, तर पुरुषांच्या अटक होण्याच्या प्रमाणात घट झालीय.
NCRB नुसार जेलमध्येही महिला कैद्यांची संख्या वाढत आहे. ही वाढ सामाजिक बदल, आर्थिक दबाव आणि संधींच्या उपलब्धतेमुळे असेल का? कायदा, शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्य संतुलन, समुपदेशन यांद्वारे नियंत्रण शक्य असावे.
शहरीकरण, पाश्चात्यीकरण, आर्थिक स्वातंत्र्याची मागणी, कुटुंब/समाजातील दबाव, गरिबी, बेकारी, बदला घेणे आदी गोष्टी ह्याच्या मुळाशी असू शकतात असं गुन्हे अन्वेषण विश्लेषकांना वाटतं.
पुरुष-प्रधान गुन्हेगारीच्या तुलनेत हे प्रमाण खूपच किरकोळ आहे हे वास्तव आहे. कौटुंबिक हिंसा अनुभवणाऱ्या आणि मानसिक दबावात येणाऱ्या स्त्रिया हयात मुख्यत्वे सामील झालेल्या असतात.
फेक फेमिनिस्ट मंडळींसाठी सूचना – पोस्ट वाचून त्रागा करू नये. शांतपणे विचार करावा
– समीर गायकवाड
Comments are closed.