नातवाच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या केतन अग्रवालच्या आजोबांनी जीव सोडला, देवीचंद अग्रवालांचा मृत
केतन अग्रवाल लोहगड किल्ला प्रकरण: काही दिवसांपूर्वी भावी पत्नीने लोहगडावरुन ढकलून हत्या केलेल्या केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे शनिवारी पुण्यात निधन झाले. केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी त्यांच्या स्टेट्सवर ‘मिस यू डॅड’ अशी पोस्ट केलीये. त्यांच्या निकटवर्तीयांनी केतनच्या (Ketan Agrawal) आजोबांचे निधन झाल्याच्या वृत्तालादुजोरा दिलाय. देवीचंद अगरवाल यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया पार पडली होती. अशातच नातू केतनची हत्या झाली, याचा त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे देवीचंद अग्रवाल यांची प्रकृती खालावली होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. (Pune Crime news)
देवीचंद अग्रवाल हे 83 वर्षांचे होते. घरातील तरुण मुलाचे निधन झाल्याने देवीचंद अग्रवाल अस्वस्थ होते. केतनचा सिया गोयल हिच्यासोबत लग्न जमवल्याचा त्यांना पश्चात्ताप होत होता. याच विचारात ते आजारी पडल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. पण दोन दिवस आयसीयूत उपचार घेतल्यानंतर त्यांचे काल निधन झाले.
केतनच्या मृत्यूनंतर देवीचंद अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी केतनच्या आजोबांनी 19 तारखेला ते सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला जाणार असल्याचे सांगितले होते. सियासाठी आपण गिफ्टही घेतल्याचे देवीचंद अग्रवाल यांनी सांगितले. आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे. मला झोपेत आणि जागेपणी सतत केतनचा चेहरा समोर येत आहे. केतनच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी हीच प्रार्थना आहे. सियाच्या सगळ्या कुटुंबाला माहिती होतं की, तिचं काहीतरी चालू आहे, त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. आम्हाला सगळ्या गोष्टी आता समजत आहेत, असे केतनच्या आजोबांनी रडत-रडत सांगितले होते.
सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी 18 जूनला केतन अग्रवाल याला लोहगडावरुन 400 फूट खोल दरीत ढकलून दिले होते. केतनच्या मृत्यूनंतर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा त्याची हत्या झाल्याचे समोर आले. सध्या सिया आणि चेतन चौधरी हे पोलीस कोठडीत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.