सरफराज खानच्या फिटनेसवर केविन पीटरसनचे मोठे वक्तव्य, पृथ्वी शॉ देखील निशाण्यावर!
सरफराज खान (Sarfaz Khan) सध्या भारतीय संघाबाहेर आहेत. मात्र तो आपल्या फिटनेसवर जोरदार मेहनत करत आहे. संघात पुनरागमन करण्यासाठी त्याने रात्रंदिवस परिश्रम घेऊन वजन कमी केलं आहे. सरफराजच्या मेहनतीचं कौतुक आता इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसननेही (Kevin piterson) केलं आहे. त्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत या तरुण खेळाडूचं अभिनंदन केलं आहे. पण, या पोस्टमध्ये त्याने पृथ्वी शॉवर (Prithvi Shaw) टीकाही केली आहे.
पूर्वी सरफराज आपल्या शरीरयष्टीमुळे सतत ट्रोल होत होता. अनेकांनी त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. सरफराजने ते मनावर घेतलं आणि फिटनेसकडे लक्ष देत आपलं वजन लक्षणीयरीत्या कमी केलं. अलीकडच्या फोटोंमध्ये तो खूपच फिट आणि सडपातळ दिसत आहे.
पीटरसननेही सरफराजच्या मेहनतीचं कौतुक करत सोशल मीडियावर लिहिलं, ‘शानदार प्रयत्न, सरफराज! खूप-खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की या बदलामुळे तुला मैदानात चांगली आणि सातत्यपूर्ण कामगिरी करता येईल. तू आपल्या प्राधान्यक्रमांची नव्यानं आखणी केलीस, हे पाहून खूप आनंद झाला.
पीटरसनला वाटतं की वजन कमी केल्यामुळे सरफराजला मोठी मदत होईल आणि तो पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी करू शकेल.
या दरम्यान, भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉ सध्या जास्त वजनामुळे अडचणीत आहे. त्यामुळेच कदाचित तो मोठ्या सामन्यांमध्ये सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याचं वजन आवश्यकतेपेक्षा खूप जास्त झालं आहे. याच कारणामुळे पीटरसनने त्याच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्याने त्याच पोस्टमध्ये लिहिलं, कोणी पृथ्वीला सरफराज खानचे हे नवीन फोटो दाखवू शकतो का? त्याचबरोबर त्याने लिहिलं, वजन कमी करता येतं. मजबूत शरीर म्हणजे मजबूत मन.
सरफराज खानला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात निवडण्यात आलं होतं, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नाही. मात्र आता त्याचं पूर्ण लक्ष भारतीय संघात पुनरागमन करण्यावर आहे.
Comments are closed.