दिल्ली बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयिताला अटक

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

दिल्ली स्फोटातील आणखी एका प्रमुख संशयिताला राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) अटक केली आहे. त्याचे नाव जसीर बिलाल वाणी ऊर्फ दानिश असे आहे. तो या स्फोटाचा मुख्य सूत्रधार डॉ. मोहम्मद उमर नबी याचा सहकारी आहे. तो ड्रोन आणि स्फोटक तज्ञ मानला जातो. त्याने दिल्ली स्फोटासाठी तांत्रिक साहाय्य पुरविलेले आहे, असा एनआयएचा आरोप आहे. दहशतवादी हल्ल्यांसाठी ड्रोन्समध्ये सुधारणा करणे, लहान क्षेपणास्त्रे किंवा अग्निबाण तयार करणे आणि इतर आधुनिक शस्त्रे निर्माण करण्याचा वाणी याचा प्रयत्न होता. या साधनांच्या साहाय्याने दूर अंतरावरुन दहशतवादी हल्ले करण्याची या दहशतवादी गटाची योजना होती. दिल्लीच्या स्फोटाच्या आधीच त्यांनी ती बनविली होती. पण पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याने त्यांचा डाव हाणून पाडला गेला होता. त्यानंतर घाईघाईत स्फोटकांची वाहतूक करत असताना दिल्लीत स्फोटाची घटना घडली होती, असे प्रतिपादन एनआयएकडून केले गेले आहे.

वाणी हा सहसूत्रधार

जसीर वाणी हा दिल्ली स्फोटाच्या कारस्थानातील सहसूत्रधार आहे. त्याने उमर नबी याला दिल्ली स्फोटासाठी तांत्रिक साहाय्य पुरविले होते. त्याने आर्थिक साहाय्यही केले असावे, असा संशय आहे. वाणी हा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील क्वाझीगंदचा रहिवासी असून तो अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांच्या संपर्कात आहे. त्याच्या चौकशीचा प्रारंभ झाल्यानंतर दहशतवाद्यांचे अनेक कारनामे बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसेच दिल्ली स्फोटामागची खरी कहाणीही त्याच्याच तोंडून बाहेर पडेल, असा एनआयएचा विश्वास आहे. दिल्ली स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाला होता, तर 30 हून अधिक नागरीक जखमी झाले होते.

अनेक राज्यांमध्ये तपास

दिल्लीचा कारस्फोट ही स्वतंत्र घटना नसून तो दहशतवादी गटांच्या व्यापक कारस्थानाचा एक भाग आहे. भारतात अनेक स्थानी असे स्फोट घडवून आणण्याची योजना होती. तथापि, दिल्ली स्फोटाच्या आधी दहशतवाद्यांच्या या योजनेचा पर्दाफाश झाल्याने ही योजना त्यांना गुंडाळावी लागली होती. आता दहशतवाद्यांची पाळेमुळे उखडून काढण्याची योजना एनआयएने कार्यरत केली असून त्यासाठी अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी तपास कार्य हाती घेण्यात आले आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश सह आणखी किमात तीन राज्यांमध्ये एनआयएने आपले जाळे पसरले आहे. दहशतवाद्यांचे कारस्थान वेळीच हाणून पाडण्यात आले नसते, तर देशात अनेक स्थानी हाहाकार माजला असता, असे एनआयएचे म्हणणे आहे. केंद्र सरकारनेही एनआयएला या साऱ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कठोर करवाई करण्याचा आदेश दिला आहे.

Comments are closed.