तुटलेले छप्पर, भिंतींना तडे, छताला टेकू; ही आहे खर्डीच्या दापूरमाळची शाळा; जीव मुठीत धरून विद्यार्थी गिरवतात धडे

नरेश जाधव, खर्डी
गावात जायला रस्ताच नसल्याने दापूरमाळ जिल्हा परिषद शाळेचे काम लटकले आहे. त्यामुळे तुटलेले छप्पर, भिंतींना तडे, तुटलेल्या दरवाजा-खिडक्या अशा भयंकर अवस्थेत विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जुन्या शाळेत शिक्षण घ्यावे लागत आहे. धक्कादायक म्हणजे छत कोसळू नये म्हणून लाकडाचा टेकू लावण्यात आला आहे. याबाबत आवाज उठवत ही परिस्थिती गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र याकडे कानाडोळा केला जात असल्याने एखादी दुर्घटना घडल्यावर सरकार रस्त्याची फाईल मंजूर करील का, असा सवाल दापूरमाळवासीयांनी केला आहे.
शहापूर तालुक्यातील दापूरमाळ जिल्हा परिषद शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत एकूण 24 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत दोन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. मात्र शाळेचे छतावरील पत्रे तुटल्याने पावसाचे पाणी आत शिरते. भितींना तडे गेल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. एवढेच नव्हे तर छत कोसळू नये म्हणून चक्क लाकडाचा टेकूही लावण्यात आला आहे. याबाबत गावकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली. जिल्हा परिषदेने मोडकळीस आलेल्या या शाळेच्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे, परंतु इमारतीच्या कामासाठी लागणारे साहित्य जागेवर नेण्यासाठी रस्ताच नसल्याने हे काम लटकले आहे. रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा पाठपुरावा करूनही प्रशासन कानाडोळा करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
रुग्णांना डोलीचा आधार
दापूरमाळ गावात दोन पाडे असून त्या ठिकाणी एकूण 42 कुटुंब राहतात. स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण झाली तरी या गावात जायला रस्ता नाही. त्यामुळे रुग्णांना डोलीतून रुग्णालय गाठावे लागत आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षण मिळण्यासाठी शासनाने येथे तात्पुरते पत्र्याचे शेड बांधून द्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचण येणार नाही अशी मागणी शिक्षक आणि पाल कांनी केली आहे.
इमारतीच्या कामासाठी लागणारे साहित्य ने-आण करण्यासाठी रस्ताच नसल्याने काम सुरू करण्यास तांत्रिक अडचण येत आहेत. या शाळेची डागडुजी करण्यासाठी येत्या दोन दिवसात इंजिनीयर इतर कर्मचारी घटनास्थळी जाऊन पाहणी करून योग्य तो पर्याय काढण्याचा प्रयत्न करू. – रामचंद्र विशे, गटशिक्षणाधिकारी, शहापूर
Comments are closed.