मंदिर देणगी घोटाळ्यावर खरगे, राहुल गांधी यांनी मोदींना पत्र लिहिलं
पंतप्रधानांच्या मौनावर उपस्थित केले प्रश्नचिन्ह
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्या आणि कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक संयुक्त पत्र लिहून राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित अनियमिततेवर त्यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दोन्ही नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी करण्याची आणि ट्रस्टच्या सर्व आर्थिक नोंदी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सर्व आर्थिक बाबींची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. ही चौकशी केवळ कागदपत्रांपुरती मर्यादित न राहता, ट्रस्टला मिळालेल्या सर्व देणग्या आणि दानांचीही सखोल तपासणी केली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.
राष्ट्रासमोर सत्या मांडणे आवश्यक!
राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी लिहिलेल्या पत्रात पंतप्रधानांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लाखो रामभक्तांच्या श्रद्धेशी संबंधित हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. देणगी अपहारासंबंधी एवढे गंभीर आरोप असूनही पंतप्रधानांचे मौन पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे त्यांचे मत आहे. या अपहाराबाबत संबंधित व्यक्तींना जबाबदार धरणे आणि राष्ट्रासमोर सत्य मांडणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे म्हणणेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed.