एक दिवस बरसून पाऊस थांबला! खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फाइल फोटो

बेभरवशाच्या पावसामुळे शेतशिवारावर पडलेले दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले, पण आर्द्रा पडल्या, त्याही एक दिवसच ! त्यानंतर पाऊस गायबच झाला. मराठवाड्याच्या आभाळात सध्या वांझोट्या ढगांचीच गर्दी झाली आहे. हवामान खात्याने चार दिवस चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकित केले होते. परंतु आता थेट जुलैमध्येच पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

यंदा ‘एल निनो ‘मुळे पर्जन्यमान कमी असल्याचा इशारा हवामान खात्याने मान्सूनच्या पहिल्या अंदाजातच दिला होता. मान्सून अंदमान निकोबार बेटावर बरसून केरळात दाखल झाला. मात्र केरळात येतानाच त्याची दमछाक झाली. केरळची किनारपट्टी चिंब चिंब करून मान्सून पुढे तेलंगणात आला, पण तोपर्यंत तो शक्तिहीन झाला होता. तेलंगणातच जवळपास १२ दिवस मान्सून रेंगाळला. महाराष्ट्रासह उर्वरित देश मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहत होता. मान्सून आला, काही भागात धो धो बरसला. काही भागात मान्सूनने हजेरी लावली.

आर्द्रा नक्षत्रावर मान्सून डेरेदाखल झाला परंतु एक दिवसच! त्यानंतर पाऊस गायबच् झाला आहे. एक दिवसाच्या पावसाने शेतातले ढेकळंही फुटले नाहीत, पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे अगोदरच पेरणीला महिनाभर उशीर झाला आहे. आता शेतशिवारात वाहवणी पाऊस झाला नाही, तर पेरणी करूनही उपयोग नाही त्यामुळे कृषी खात्यानेही दोन तीन पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन केले आहे.

‘सुखना’ सुकले!

मृग संपून आर्द्रा नक्षत्र सुरू झाले, पण चांगला पाऊस पडला नाही. गेल्या वर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे भरलेली धरणे, जलाशय आता रिते होत आहेत. छत्रपती संभाजीनगराच्या जवळच असलेले सुखना धरण फ्लेमिंगोंचे आवडते पर्यटनस्थळ. पाऊसच नसल्यामुळे सुखना धरणाचा भेगाळलेला तळ उघडा पडला आहे.

Comments are closed.