जेतेपदासाठी पुणे-मुंबई उपनगर तर धाराशीव-सांगली झुंज

खंडोबा मैदानावर सुरू असलेल्या हिरक महोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटात पुणे विरुद्ध मुंबई उपनगर तर महिला गटात धाराशीव विरुद्ध सांगली यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे.
पुरुष गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात पुण्याने सांगलीचा 1 गुण व 5 मिनिटे 30 सेकंद राखून (18-17) धुव्वा उडवला. पुण्याच्या शुभम थोरात, रुद्र थोपटे, शिवराम शिंगाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सांगलीच्या मिलिंद चावरेकरने आक्रमक खेळ करत संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याला अभिषेक केरीपाळेची चांगली साथ लाभली. सांगली संघाने पहिल्या डावात आक्रमक खेळ केला, मात्र मध्यंतरानंतर ते सातत्य राखू शकले नाहीत.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरने धाराशीवचा 7 गुणांनी (20-13) पराभव केला. मध्यंतराला मुंबई उपनगर संघाकडे 3 गुणांची (10-7) आघाडी होती, जी धाराशीव मोडीत काढू शकला नाही. विजयी संघात अनिकेत चेंदवणेकर, ऋषिकेश मुरचावडे, ओंकार सोनवणे यांनी उत्कृष्ट खेळ केला. धाराशीव संघात सचिन पवार, रवी वसावे , सोहन गुंड यांनी संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले, पण ते अपुरे ठरले.
महिला गटात धाराशीवविरुद्ध सांगली अंतिम लढत
महिला गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात धाराशीवने पुण्याचा 1 गुण व 7.50 मिनिटे राखून (10-9) पराभव केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सांगलीने नाशिकचा 1 गुण व 1 मिनिट राखून (12-11) विजय मिळवला. सांगली संघात सानिका चाफे, रिया चाफे, प्रतीक्षा बिराजदार यांनी जोरदार कामगिरी केली. नाशिक संघात कौशल्या पवार, सरिता दिवा यांनी चांगला प्रतिकार केला.
Comments are closed.