पाठीवर कौतुकाची थाप पडू दे! आजपासून खो-खोचे पहिले जागतिक पर्वारंभ, जगभरातील पुरुषांच्या 20 तर महिलांच्या 19 संघांची धावाधाव

गेली अनेक दशके ग्लॅमरच्या प्रतीक्षेत असलेल्या मऱहाटमोळय़ा खो-खोला वर्ल्ड कपच्या रूपाने नव्या जागतिक पर्वाचा प्रारंभ होतोय. पहिल्या वहिल्या वर्ल्ड कपमध्ये आपला वेग, आपले कौशल्य आणि चपळता दाखवण्यासाठी जगभरातील पुरुषांचे 20 तर महिलांचे 19 संघ मॅटवर उतरतील. आजवर पाठीवर थाप मारून खो देणाऱया या खेळाला जगाला आपला करिश्मा दाखवण्यासाठी तमाम हिंदुस्थानींकडून पाठीवर कौतुकाच्या थापेची माफक अपेक्षा आहे. ती पडू दे आणि इतिहास घडू दे.

राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम सोमवारपासून सुरू होणाऱया खो-खो विश्वचषकासाठी एखाद्या नववधूप्रमाणे नटलेय. आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खोला ओळख मिळवून देणाऱया या स्पर्धेसाठी जगभरातील आलेल्या संघांचे आणि खेळाडूंचे जोरदार स्वागत करत हिंदुस्थानने आपल्या ‘अतिथी देवो भव’ची परंपरा जपलीय. पुढील सात दिवस खो-खोला ग्लोबल खेळ म्हणून लोकप्रियता मिळवून देण्यासाठी सारे आपला सर्वोत्तम खेळ दाखवतील, असा विश्वास हिंदुस्थानी खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी व्यक्त केलाय.

धमाकेदार उद्घाटन आणि जोरदार विजयासाठी हिंदुस्थान सज्ज

खो-खोच्या वर्ल्ड कपचा उद्घाटन सोहळा दिमाखदार करण्यासाठी आयोजकांनी जबरदस्त मेहनत घेतली आहे. हिंदुस्थानची परंपरा अवघ्या जगाला दाखवून देणारे कलाकार आपले नृत्यकाwशल्य आणि कसरती सादर करतील. तसेच सहभागी सर्व खेळाडू ध्वज संचलन करून स्पर्धेत सहभागी होतील. हिंदुस्थानचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा रंगेल. सायंकाळी 7 वाजता स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ाला प्रारंभ होईल तर हिंदुस्थान आणि नेपाळ यांच्यातील उद्घाटनीय सामना रात्री 8.30 वाजता खेळविला जाणार असून यात हिंदुस्थान मोठा विजयानिशी आपल्या जगज्जेतेपदाची मोहीम सुरू करील.

खो-खो विश्वचषकाची गटवारी (पुरुष)

  • अ गट – हिंदुस्थान, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
  • ब गट – द.आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलॅण्ड्स, इराण
  • क गट – बांगलादेश, श्रीलंका, द. कोरिया, अमेरिका, पोलंड
  • ड गट – इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया.

खो-खो विश्वचषकाची गटवारी (महिला)

  • अ गट – हिंदुस्थान, मलेशिया, इराण, द. कोरिया.
  • ब गट – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलॅण्ड्स.
  • क गट – नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
  • ड गट – द. कोरिया, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया

हिंदुस्थानचे एकच लक्ष्य दुहेरी जगज्जेतेपद

हिंदुस्थानचे पुरुष आणि महिला संघ हेच पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदाचे संभाव्य दावेदार आहेत. आशिया संघांमधील नेपाळ, मलेशिया, बांगलादेश, इराणसारख्या संघांनी गेल्या काही वर्षात खो-खोत लक्षणीय प्रगती करत हिंदुस्थानी संघाला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. तरीही हिंदुस्थानी संघाच्या ताकदीपुढे ते काहीसे कमकुवतच आहेत. त्यामुळे दिल्लीत खो-खोच्या कुंभमेळ्यात जगज्जेतेपदाचे शाही स्नान हिंदुस्थानचे दोन्ही संघ करतील, याबाबत कुणाच्याही मनात तीळमात्र शंका नाही. त्याचबरोबर हिंदुस्थानी संघांचा खेळ आणि आयोजन पाहून स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांनाही स्फूर्ती लाभेल, हे निश्चित आहे. या स्पर्धेत निम्मे संघ आशियाई आहेत आणि त्यांच्याच खेळाचे हिंदुस्थानसमोर आव्हान असेल. आशियातील काही देशांमध्ये मध्यंतरीच्या काळात आपल्या देशातून प्रशिक्षक धाडण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे संघ पुरुष आणि महिला गटांमध्ये जोरदार लढत देतील, अशी अपेक्षा आहे.

खो-खोचा नवा विश्वविक्रम

खो-खो वर्ल्ड कपच्या पहिल्या पर्वात पाश्चात्य देशांची उपस्थिती पाहून सारेच भारावले आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड कपच्या पहिल्याच आयोजनात 20 देशांचा सहभाग पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. आजवर कोणत्याही खेळाच्या पहिल्या जागतिक आयोजनात 20 देश खेळले नव्हेत. जगात सर्वात लोकप्रिय असलेल्या फुटबॉलच्या वर्ल्ड कपमध्येही 13 देश खेळले होते आणि आपल्या हिंदुस्थानींसाठी धर्म असलेल्या क्रिकेटच्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये 8 संघ खेळले होते. या विश्वविक्रमी आयोजनात अमेरिका, पोलंड, नेदरलॅण्ड्स आणि जर्मनी या देशांचा सहभाग विशेष ठरणार आहे. याशिवाय, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दक्षिण गोलार्धातील देशही उत्साहात सहभागी झाले आहेत. अर्जेंटिनाचा सहभाग दक्षिण अमेरिकेतील खो-खोला मिळालेली देणगी ठरणार आहे. यापूर्वी हिंदुस्थान व इंग्लंड या देशांनी एकमेकांच्या देशात जाऊन खो-खो स्पर्धा खेळली होती.

Comments are closed.