उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी, किम जोंग उन यांनी मुलीसह केलं मॉनिटर
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी एका आठवड्यात दुसऱ्यांदा मोठ्या क्षेपणास्त्र चाचणीचे थेट निरीक्षण करून जगाला आपल्या लष्करी शक्तीचा इशारा दिला आहे. मंगळवारी उत्तर कोरियाच्या पश्चिम किनारपट्टीवर एका आधुनिक युद्धनौकेवरून धोरणात्मक क्रूझ क्षेपणास्त्रांचा (Strategic Cruise Missiles) यशस्वी मारा करण्यात आला. या महत्त्वाच्या लष्करी मोहिमेदरम्यान किम जोंग उन यांच्यासोबत त्यांची मुलगी किम जू ऐ ही देखील उपस्थित होती, ज्यामुळे पुन्हा एकदा तिच्या संभाव्य वारसदारीच्या चर्चांना उधाण आले आहे.
उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने (KCNA) दिलेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे चो ह्योन (Choe Hyon) नावाच्या अद्ययावत नौदल युद्धनौकावरून डागण्यात आली. ही युद्धनौका केवळ एक वर्ष जुनी आहे. चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्रांनी समुद्रातील निर्धारित लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. किम जोंग उन आणि त्यांची १३ वर्षीय मुलगी एका नियंत्रण कक्षातून या प्रक्षेपणाचे थेट प्रक्षेपण पाहताना दिसले.
या चाचणीनंतर बोलताना किम जोंग उन यांनी देशाच्या अण्वस्त्र सज्जतेवर आणि प्रतिबंधक यंत्रणेवर (Nuclear War Deterrent) विशेष भर दिला. शत्रू राष्ट्रांच्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी उत्तर कोरियाचे नौदल आणि हवाई दल पूर्णपणे सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक मोठ्या लष्करी कार्यक्रमात किम जोंग उन यांच्या मुलीची उपस्थिती दिसत आहे. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांच्या मते, किम आपल्या मुलीला भविष्यातील सर्वोच्च नेत्या म्हणून जाणीवपूर्वक जगासमोर आणत आहेत.
Comments are closed.