किंग खानच्या जुन्या घराला मिळणार नवा साज; शाहरुखने जपून ठेवलेल्या आठवणींचं घर पुन्हा सजणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान सध्या त्याच्या बहुचर्चित ‘मन्नत’ बंगल्याच्या नूतनीकरणामुळे चर्चेत आहे. मात्र, आता केवळ ‘मन्नत’चेच नाही, तर शाहरुखच्या मुंबईतील दुसऱ्या घराचेही नूतनीकरण सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपट निर्माते आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या आनंद पंडित यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शाहरुख खान एप्रिल 2025 पासून वांद्रे येथील ‘पूजा कासा’ या इमारतीत भाड्याने राहत आहे. दरम्यान, ‘मन्नत’मध्ये मोठ्या प्रमाणावर नूतनीकरणाचे काम सुरू असून, बंगल्याच्या मागील भागात दोन नवीन मजले जोडले जात असल्याचे सांगितले जात आहे.

आनंद पंडित यांच्या रिअल इस्टेट कंपनीकडून ‘मन्नत’च्या नूतनीकरणाचे काम केले जात आहे. रवी केवलरामानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना आनंद पंडित यांनी सांगितले की, “आम्ही ‘मन्नत’च्या मागील भागात काही मजले जोडत आहोत.” विशेष म्हणजे, आनंद पंडित हे शाहरुख खानच्या आणखी एका घराच्या नूतनीकरणाचे कामही करत आहेत. हे घर वांद्रे येथेच असून, ते 4 बीएचके अपार्टमेंट असल्याची माहिती आहे.

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार हे शाहरुख खानचे मुंबईतील सुरुवातीच्या काळातील घर असल्याचे सांगितले जाते. करिअरच्या सुरुवातीला शाहरुखने हे घर खरेदी केले होते. नंतर ‘मन्नत’मध्ये स्थायिक झाल्यानंतरही त्याने हे घर विकले नाही. या घराशी शाहरुखचे भावनिक नाते असल्याचे आनंद पंडित यांनी सांगितले. शाहरुखने स्वतः या घराबद्दल आपल्याशी संवाद साधल्याचेही आनंद पंडित यांनी नमूद केले. त्यामुळे हे घर अभिनेत्यासाठी केवळ एक मालमत्ता नसून त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असल्याचे दिसून येते.

‘मन्नत’चे नूतनीकरण सुरू असल्याने शाहरुख सध्या वांद्रे येथील ‘पूजा कासा’मध्ये राहत आहे. ही इमारत निर्माता वासू भगनानी आणि त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची असल्याचे वृत्त आहे. शाहरुखने येथे तीन वर्षांसाठी दोन आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट भाड्याने घेतल्याची माहिती आहे.

दरम्यान, शाहरुख खान त्याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटामुळेही चर्चेत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान दिसणार आहे. अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून, हा चित्रपट 24 डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Comments are closed.