किनवटमध्ये धुमाकूळ; अस्वलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू तर आठ जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

किनवट तालुक्यातील दयाळ धानोरा येथे बुधवारी दि.11 मध्यरात्री अस्वलाने केलेल्या भीषण हल्ल्यात एक शेतकरी ठार तर आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलग नऊ जणांवर हल्ला झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मृत शेतकर्‍याचे नाव दत्ता बळीराम जाधव असे असून ते रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेले असताना अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाले. त्यांच्या सोबत असलेले रमेश बळीराम जाधव (45) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये चंद्रसिंग शेषराव राठोड (30), शंकर तानाजी जाधव (50), सुदर्शन दत्ता पवार (35), पंडित जयसिंग जाधव (22), विनोद शेषराव राठोड (34), अरविंद शेषराव जाधव (35), संजय दत्ता जाधव (35) व रमेश बळीराम जाधव (45) यांचा समावेश आहे. यापैकी चंद्रसिंग राठोड, शंकर जाधव, सुदर्शन पवार व रमेश जाधव हे गंभीर जखमी असून चंद्रसिंग राठोड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण व पाणी देण्यासाठी रात्री शेतात गेले होते. त्यावेळी अचानक अस्वलाने दत्ता जाधव व रमेश जाधव यांच्यावर झडप घातली. त्यांच्या आरडाओरडीनंतर आसपासच्या शेतकर्‍यांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र अस्वलाने आक्रमक पवित्रा घेत एकामागून एक अशा नऊ जणांवर हल्ला केला. या प्रकारामुळे गावकर्‍यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल बी.डी. डवरे, वनरक्षक सी. पी. गडलिंगे, बी. एम. सोनकांबळे, एम.एम. पाडदे तसेच इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जेसीबीच्या साहाय्याने गावात आणून तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि इस्लापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी गावात आणताना जेसीबीची मदत घ्यावी लागली. शिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र टोणपे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या बचावकार्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी सैनिक आणि तरुणांनी मोठे सहकार्य केले. एकाच वेळी नऊ जणांवर हल्ला होण्याची ही दुर्मिळ आणि भीषण घटना असल्याने ग्रामस्थांकडून वनविभागाने तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Comments are closed.