विश्वचषक ट्रॉफी मंदिरात नेण्यावरून कीर्ती आझाद यांचा सवाल, हरभजन सिंगने दिले उत्तर

गेल्या रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडचा (Ind vs NZ Final) ९६ धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकल्यानंतर संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे. मात्र, १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद यांना यात काहीतरी वेगळेच दिसत आहे. ज्या दृष्टिकोनातून ते या घटनेकडे पाहत आहेत, त्या लेन्सने पाहणारे ते एकमेव व्यक्ती ठरत आहेत. खरे तर, विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जय शाह आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ट्रॉफीसह जवळच्याच हनुमान मंदिरात गेले आणि या जेतेपदासाठी ईश्वराचे आभार मानले. याच मुद्द्यावरून विश्वविजेत्या संघाचे माजी सदस्य कीर्ती आझाद यांनी ‘X’ वर एक मोठी पोस्ट लिहिली. त्यानंतर संसदेच्या आवारात हरभजन सिंगने या वादावर आपली प्रतिक्रिया दिली.
कीर्ती आझाद यांच्या या वादग्रस्त टिप्पणीवर सर्वात आधी पाटण्याला परतलेल्या टीम इंडियाचा सदस्य इशान किशनला प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, कोणत्याही वादात पडणे टाळत इशानने यावर उत्तर देणे टाळले, जे पूर्णपणे समजण्यासारखे आहे. परंतु, हरभजन सिंगने कीर्ती आझाद यांच्या या कमेंटला ‘राजकारणाने प्रेरित’ असल्याचे म्हटले आहे.
आझाद यांच्या टिप्पणीबाबत विचारलेल्या प्रश्नावर हरभजन सिंग म्हणाला, “ही अत्यंत विचित्र आणि बिनबुडाची गोष्ट आहे. ते मंदिरात का गेले? यावरूनही राजकारण केले जात आहे याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी मंदिरात जावे, गुरुद्वारात जावे, मशिदीत जावे किंवा इतर कुठेही जावे. त्यांनी देवाकडे जे काही मागितले होते आणि जर त्यांची इच्छा पूर्ण झाली असेल, तर ते त्यांच्या इच्छेनुसार कुठेही जाऊ शकतात. यावर राजकारण करू नये.” हरभजन पुढे म्हणाला, “कीर्ती भैया स्वतः क्रिकेटपटू राहिले आहेत. मला त्यांच्याकडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. आपल्याच एका सहकारी क्रिकेटपटूकडून अशा गोष्टी येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. कदाचित ते राजकारणाला जास्त महत्त्व देत आहेत. ते स्वतः एक खेळाडू आहेत, हेच ते विसरले आहेत. देश विश्वचषक जिंकला आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. राजकारण करण्याऐवजी तुम्ही आनंद साजरा करा. सर्व धर्म एकच आहेत. कोणी मंदिरात जावो वा मशिदीत, रस्ता एकच आहे. जर ते हनुमान मंदिरात गेले असतील, भगवान शिव मंदिरात गेले असतील किंवा गुरुद्वारात गेले असतील, तर ती एकच गोष्ट आहे. त्यात काही फरक नाही. ही त्यांची श्रद्धा आहे आणि कोणाच्याही श्रद्धेवर असे प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत.”
Comments are closed.