किसन सम्मन निधी यांनी तीन राज्यात सोडले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 21 वा हप्ता वेळेआधीच जारी केला आहे. पूरग्रस्त उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांमधील 27 लाख शेतकऱ्यांसाठी हा हप्ता निर्धारित वेळेपूर्वीच जारी करण्यात आला आहे. सदर राज्यांना अलीकडेच भीषण पुराचा सामना करावा लागला होता. पंतप्रधान किसानच्या 21 व्या हप्त्याअंतर्गत 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी लवकर मिळाल्यामुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. हिमाचल प्रदेशातील 8 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 160 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. तसेच उत्तराखंडमधील 7 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 157 कोटी रुपये आणि पंजाबमधील 11 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 221 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी दिली.
सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांना पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने पिके आणि पशुधनाचे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कठीण परिस्थितीत शेतक्रयांना मदत म्हणून ही रक्कम दिली आहे. या मदतीला डायरेक्ट हेल्प आणि डायरेक्ट ट्रस्ट असे नाव देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी खते आणि बियाण्याची व्यवस्था करता येईल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
इतर राज्यांना दिवाळीपूर्वी लाभ
दिवाळीपूर्वी इतर राज्यांनाही पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता जारी केला जाऊ शकतो. देशभरातील अंदाजे 10 कोटी शेतकरी पीएम किसानचा लाभ घेतात. त्यापैकी उत्तर प्रदेशात 2 कोटींहून अधिक शेतकरी आहेत. पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी 2,000 रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्यांची केवायसी प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Comments are closed.