अय्यरऐवजी केकेआरने रहाणेवर का टाकला विश्वास? निवडीचे मोठे कारण उघड!
कोलकाता नाईट रायडर्सच्या व्यवस्थापनाने कर्णधारपदाच्या निवडीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. संघाने विक्रमी किमतीत खरेदी केलेल्या व्यंकटेश अय्यरऐवजी अनुभवी अजिंक्य रहाणेच्या हातात नेतृत्वाची धुरा सोपवली आहे.
गेल्या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने विजेतेपद मिळवले होते, परंतु या हंगामासाठी संघाने त्याला ना कायम ठेवले, ना लिलावात परत विकत घेतले. त्यामुळे नवीन कर्णधाराची निवड अनिवार्य होती. व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटी रुपयांना संघात सामील केल्यामुळे तोच कर्णधार होईल अशी चर्चा होती. मात्र, केकेआरने अनुभवी रहाणेवर विश्वास दाखवला आणि त्याला 1.5 कोटी रुपयांत संघात घेत कर्णधारपदी निवड केली.
केकेआरने व्यंकटेश अय्यरला थेट कायम ठेवण्याऐवजी लिलावात प्रचंड किंमत मोजून त्याला संघात घेतले. जर त्यांनी आधीच त्याला कायम ठेवले असते, तर तो जास्तीत जास्त 18 कोटी रुपयांत संघात राहू शकला असता. पण, फ्रँचायझीने वेगळ्या धोरणावर भर दिला.
केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांनी स्पष्ट केले की, कर्णधारपदाचा अतिरिक्त ताण तरुण व्यंकटेश अय्यरवर टाकण्याऐवजी तो अनुभवी रहाणेकडे सोपवणे योग्य ठरेल. त्यांनी सांगितले की, “आयपीएल हा तगडा सामना असतो. कर्णधारपदासाठी स्थिर मन आणि अनुभव आवश्यक असतो, जो रहाणेकडे आहे.”
रहाणेची कर्णधार म्हणून कारकीर्दही उल्लेखनीय आहे. त्याने भारताचे 11 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे, मुंबईच्या स्थानिक संघाचेही नेतृत्व केले आहे आणि आयपीएलमध्ये देखील कर्णधारपद भूषवले आहे. 185 आयपीएल सामने आणि 200 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या रहाणेकडून केकेआरला मोठ्या अपेक्षा आहेत.
संघाच्या या निर्णयावर काही जणांनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींना ही योग्य रणनीती वाटते. आता आगामी हंगामात रहाणेच्या नेतृत्वाखाली केकेआर कसा प्रदर्शन करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Comments are closed.