केकेआर आता नव्या मालकाच्या हाती? आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स पाठोपाठ शाहरुखच्या संघातही होणार मोठे बदल!
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामासाठी (16 डिसेंबर 2025) रोजी अबू धाबी येथील एतिहाद एरिनामध्ये मिनी लिलाव पार पडला. या लिलावानंतर अवघ्या तीन दिवसांतच, माजी विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
एका अहवालानुसार, तीन वेळा आयपीएलचे जेतेपद भूषवणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्समधील हिस्सा (Stake) विकण्याची तयारी सुरू आहे. अशा प्रकारे, आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी विक्रीच्या बातम्या समोर येणारी ही तिसरी फ्रँचायझी ठरली आहे. यापूर्वी सर्वात आधी सध्याचा आयपीएल विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विकला जाणार असल्याची बातमी आली होती. त्यानंतर लीगचा पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्समध्येही हिस्सा विकला जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
‘मनीकंट्रोल’च्या वृत्तानुसार, शाहरुख खान आणि जुही चावला-जय मेहता यांच्या मालकीची कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ही फ्रँचायझी पुढील वर्षी म्हणजेच 2026 मध्ये विक्रीची प्रक्रिया सुरू करू शकते. मात्र, या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सच्या तुलनेत कोलकाता संघात केवळ एक लहान हिस्सा (Minority Stake) विकला जाईल.
बेंगळुरूची मालक असलेली कंपनी ‘डिएजियो’ने (Diageo) काही काळापूर्वीच पुष्टी केली होती की, त्यांना फ्रँचायझी विकण्याची प्रक्रिया मार्च 2026 पूर्वी पूर्ण करायची आहे. बेंगळुरू आणि राजस्थानच्या बाबतीत फ्रँचायझीची मालकी (Ownership) पूर्णपणे बदलण्याची तयारी सुरू आहे. मात्र, या दोन्ही संघांच्या तुलनेत कोलकाताची परिस्थिती वेगळी आहे. अहवालानुसार, सध्या केवळ मेहता ग्रुपच आपला एक छोटा हिस्सा विकू इच्छितो, परंतु यामुळे फ्रँचायझीच्या मालकी हक्कावर (Ownership Control) कोणताही परिणाम होणार नाही.
आयपीएलचा तीन वेळा विजेता ठरलेला संघ कोलकाता नाईट रायडर्सचे मालक बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, दिग्गज अभिनेत्री जुही चावला आणि तिचे पती जय मेहता हे आहेत. ही फ्रँचायझी ‘नाईट रायडर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीअंतर्गत चालवली जाते.
यामध्ये शाहरुख खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट (Red Chillies Entertainment) कंपनीचा 55 टक्के हिस्सा आहे, तर जुही चावला आणि जय मेहता यांच्या मेहता ग्रुपचा 45 टक्के हिस्सा आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ही त्या 8 मूळ फ्रँचायझींपैकी एक आहे, ज्यांच्यासोबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात केली होती. त्यावेळी शाहरुख खानची ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ आणि जुही चावला व जय मेहता यांच्या ‘मेहता ग्रुप’ने 75 दशलक्ष डॉलर्स (त्यावेळी सुमारे 298 कोटी रुपये) मध्ये हा संघ विकत घेतला होता. त्यावेळी कोलकाता ही आयपीएलमधील आठ संघांपैकी सातवी सर्वात महागडी टीम होती. संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी 2012 मध्ये पहिल्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा आणि 10 वर्षांनंतर 2024 मध्ये तिसऱ्यांदा हा संघ चॅम्पियन बनला.
Comments are closed.