केएल राहुल क्रिकेटमधून संन्यास घेणार? स्वतःच केला याबाबत संपूर्ण खुलासा
केएल राहुल सध्या टीम इंडियाच्या सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक मानला जातो. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो सातत्याने भारतीय संघासाठी खेळत असून महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. मात्र, टी-20 आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर राहिल्यानंतर राहुल लवकरच क्रिकेटमधून संन्यास घेणार का, असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात उपस्थित केला जात होता. आता या चर्चांवर स्वतः केएल राहुलने स्पष्टपणे भाष्य करत संपूर्ण चित्र स्पष्ट केले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुल भारतासाठी सलामीवीराची भूमिका यशस्वीपणे निभावत आहे, तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्यावर फिनिशरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय, यष्टीरक्षक म्हणूनही तो संघासाठी मोलाचे योगदान देत आहे. या सगळ्या दरम्यान, एका मुलाखतीत राहुलने कबूल केले की काही काळापूर्वी त्याच्या मनात संन्यास घेण्याचा विचार आला होता. मात्र, तो विचार फार काळ टिकला नाही. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याच्याशी संवाद साधताना राहुलने याबाबत मोकळेपणाने आपली भूमिका मांडली.
“संन्यासाचा निर्णय घेणं फारसं कठीण नाही, कारण क्रिकेटच्या बाहेरही जगात अनेक गोष्टी आहेत,” असे राहुलने स्पष्ट केले. तो पुढे म्हणाला, “जर आपण स्वतःशी प्रामाणिक असलो, तर योग्य वेळ आल्यावर निर्णय आपोआप होतो. हा असा विषय आहे, जो फार काळ टाळता येत नाही. मात्र, मला असं वाटतं की माझ्या संन्यासासाठी अजून थोडा वेळ आहे.”
केएल राहुलचा आतापर्यंतचा कसोटी आणि एकदिवसीय कारकिर्दीचा आढावा घेतला, तर तो प्रभावीच म्हणावा लागेल. 1992 साली जन्मलेला राहुल सध्या 33 वर्षांचा असून, एप्रिलमध्ये तो आपला वाढदिवस साजरा करणार आहे. आतापर्यंत त्याने भारतासाठी 67 कसोटी सामने खेळत चार हजारहून अधिक धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 11 शतके आणि 20 अर्धशतके आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुलने 94 सामने खेळत 3360 धावा केल्या असून, त्यात आठ शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुल सध्या संघाबाहेर असला, तरी त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. त्याने 72 टी-20 सामने खेळत 2265 धावा केल्या असून, या फॉरमॅटमध्येही दोन शतके आणि 22 अर्धशतके त्याच्या नावावर आहेत. 2022 साली त्याने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. सध्या राहुल आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असून, संघाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तो सदैव तयार असल्याचे दिसून येते.
Comments are closed.