केएल राहुलच्या वर्षभराच्या मेहनतीला यश, मोठी खेळी करण्याची ट्रिक सापडली

भारतीय फलंदाज केएल राहुलनं एक दशकाहून अधिक कारकिर्दीत घरच्या मैदानावर फक्त दोनच कसोटी शतकं झळकावली आहेत. पण हा आकडा सुधारण्यासाठी तो कठोर मेहनत करत असल्याचं त्यानं सांगितलं. इंग्लंड दौऱ्यावर चमकदार कामगिरी केलेल्या राहुलनं वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवशी आपल्या कारकिर्दीतील 11वं शतक ठोकलं. याआधी घरच्या मैदानावर त्यानं 2016 मध्ये चेन्नईत ह्याच संघाविरुद्ध शतक झळकावलं होतं.

दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेव्हा राहुलला घरच्या मैदानावर फक्त दोनच शतकं झाल्याबद्दल विचारलं गेलं, तेव्हा तो म्हणाला, “माहित नाही, खरंच. पण मी गेल्या वर्षभरात माझ्या फलंदाजीची लय टिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अशा टप्प्यांचा आनंद घेत आहे जे नेहमी रोमांचक नसतात.”

राहुल म्हणाला की घरच्या मैदानावर खेळताना तो आता एक-एक आणि दोन-दोन धावा काढण्यावर विशेष लक्ष देतोय. याआधी त्याला हे जमायचं नाही. “परदेशात अतिरिक्त उंची आणि स्विंग असलेल्या परिस्थितीत असं करणं अवघड असतं. पण जेव्हा घरी परत येतो आणि तीन फिरकीपटू खेळत असतात, तेव्हा स्कोर वाढवण्यासाठी एकेका धावेनं पुढं जाणं गरजेचं असतं. कारण चौकार इतक्या सहज मिळत नाहीत.”

तो पुढं म्हणाला, “यावर मी काम केलं आहे. याचा आनंद घेण्यासाठी मानसिक बदल आवश्यक होता. मी मेहनतीचा आनंद घेत छोट्या धावांमधून शतक गाठण्यावर लक्ष केंद्रित केलं. गेल्या वर्षभरात मी याच्यावर खूप मेहनत घेतली आहे. मला वाटतं हाच तो एकमेव फरक आहे जो आधी घरच्या मैदानावर मला जमत नव्हता.”

Comments are closed.