मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र कशी ठरेल? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!

आयपीएल 2025 प्लेऑफसाठी 3 संघ पात्र ठरले असले तरी एका स्थानासाठी अजूनही 3 संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आहेत. आयपीएल स्पर्धेत काल 18 मे रोजी 60 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्या घरच्या मैदानावर 10 विकेट्सने एकतर्फी पराभव केला. गुजरातने 19 षटकांत 200 धावांचे लक्ष्य गाठले. यानंतर गुजरातचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला.

गुजरात टायटन्स सहित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्सचे संघही यंदाच्या आयपीएल प्लेऑफमध्ये अधिकृतपणे पोहोचले आहेत. आरसीबी आणि पंजाबचे संघ क्वालिफाय होण्याच्या उंबरठ्यावर होते. पण गुजरातने दिल्लीचा पराभव करताच 3 संघांचं गणित अधिक सोपं झालं आणि तिन्ही संघ 16 पेक्षा जास्त गुण असल्याने क्वालिफाय झाले.

गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर साई सुदर्शनने 61 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकारांसह 108 धावा केल्या आणि कर्णधार शुबमन गिलने 53 चेंडूत 93 धावा केल्या. त्यानंतर गुजरातने दिल्लीवर सहज विजय मिळवला.

गुजरातचा संघ 12 सामन्यांनंतर 18 गुणांवर आहेत, तर आरसीबी आणि पंजाब किंग्सचे 12 सामन्यांनंतर प्रत्येकी 17-17 गुण आहेत. मुंबई इंडियन्स 14, दिल्ली कॅपिटल्स 13 आणि लखनऊ सुपर जायंट्स 10 गुणांसह चौथ्या, पाचव्या आणि सातव्या स्थानावर आहेत आणि उर्वरित एका स्थानासाठी या तिन्ही संघांमध्ये चढाओढ असणार आहे.

आता प्लेऑफमध्ये एका स्थानासाठी दिल्ली, मुंबई आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चुरस आहे. या 3 संघांपैकी फक्त मुंबई 18 गुणांचा आकडा गाठू शकते. मुंबई आणि दिल्लीमध्ये सामना होणार असल्याने दोघांपैकी फक्त एकच संघ 17 किंवा त्याहून अधिक गुण मिळवू शकेल.

मुंबई संघ मजबूत आहे. 18 गुण मिळवण्यासाठी मुंबईला पंजाब आणि दिल्लीला पराभूत करावे लागेल. जर असं झालं तर दिल्ली 17 गुणांपर्यंत पोहोचू शकणार नाही. तिन्ही सामने जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी लखनऊ संघाला आशा करावी लागेल की दिल्ली आणि मुंबई 16 किंवा त्याहून अधिक गुणांपर्यंत पोहोचणार नाहीत.

दिल्लीचा मुंबईने पराभव केला तर दिल्ली स्पर्धेतून बाहेर पडेल. जर दिल्ली जिंकली तर मुंबईला पंजाबविरुद्धचा शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल आणि दिल्लीने त्यांचा शेवटचा लीग सामना पंजाबविरुद्ध गमवावा अशी आशा करावी लागेल.

गुजरात टायटन्सने 22 मे रोजी लखनऊ आणि 25 मे रोजी चेन्नईविरुद्धचे उर्वरित 2 सामने जिंकल्यास ते टॉप-2 मध्ये कायम राहतील आणि 29 मे रोजी होणाऱ्या पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळतील. जर गुजरातने 1 सामना गमावला तसेच पंजाब किंवा आरसीबीने त्यांच्या उर्वरित लीग सामन्यांपैकी एक सामना गमावला, तरीही गुजरात अव्वल दोनमध्ये राहील. पण इतर संघांचे निकालही गुजरातच्या टॉप-2 मध्ये असण्यावर परिणाम करतील.

Comments are closed.