विराट-रोहितने खरंच वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी का? आकडे सांगतात सत्य

सोशल मीडियावर सध्या विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. मोठा प्रश्न असा विचारला जातोय की, बीसीसीआय आणि निवड समितीच्या 2027 च्या वनडे वर्ल्डकपच्या योजनांमध्ये कोहली-रोहित बसतात का? अशा चर्चा सुरू आहेत की बीसीसीआय, रोहित शर्माच्या जागी शुबमन गिलला (Shubman gill) एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे.

पण कोहली-रोहितची आकडेवारी टीकाकारांच्या चेहऱ्यावर जोरदार चपराक मारणारी आहे. दोन्ही दिग्गज फलंदाजांनी गेल्या दोन वर्षांत 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. हे असे आकडे आहेत की जे निवडकर्ते सहजपणे दुर्लक्षित करू शकणार नाहीत.

किंग कोहलीने (Virat Kohli) 2023 साली एकूण 27 वनडे सामने खेळले. या दरम्यान त्याने 72 च्या अप्रतिम सरासरीने 1377 धावा केल्या. यात 6 शतके आणि 8 अर्धशतके होती. 2024 मध्ये त्याला फक्त 3 वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आणि त्यातून 58 धावा केल्या. 2025 मध्ये मात्र किंग कोहली पुन्हा रंगात आला. या वर्षी आत्तापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यांत त्याने 45 च्या सरासरीने 275 धावा केल्या असून 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत.

वनडे फॉरमॅटमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील मागे नाही. यंदा हिटमॅनने 8 सामने खेळले असून 37 च्या सरासरीने 302 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतक आहे. 2024 मध्ये खेळलेल्या 3 वनडे सामन्यांत त्याने 52 च्या सरासरीने 157 धावा केल्या. 2023 मध्ये रोहितने 26 डावांत 52 च्या सरासरीने 1255 धावा ठोकल्या. ही आकडेवारी स्पष्ट सांगते की वनडेत कोहली-रोहितचा जलवा अजूनही कायम आहे आणि या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाला (Team india) त्यांची गरज आहे.

कोहली-रोहितने मिळून 12 वर्षांनंतर भारताला 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. कोहलीने 5 सामन्यांत 54 च्या सरासरीने 218 धावा केल्या. तर रोहितच्या बॅटमधून 180 धावा आल्या. अंतिम सामन्यात रोहितने केवळ 83 चेंडूत 76 धावा करत शानदार खेळी साकारली आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला.

Comments are closed.