पाकिस्तानला कोहलीचा धक्का!

विराट कोहली: 100 बाहेर नाही

मंडळ/ दुबई

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील बहुप्रतीक्षित हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकवर 6 गड्यांनी शानदार विजय मिळवित 2017 मध्ये अंतिम फेरीत झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड केली. आधी गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करीत पाकला 49.4 षटकांत 241 धावांवर गुंडाळले. त्यानंतर श्रेयस अय्यरचे अर्धशतक, व शुभमन गिलच्या उपयुक्त खेळीच्या बळावर भारताने 7.3 षटके बाकी ठेवत दणदणीत विजय मिळविला. एकूण 51 वे तसेच पाकविरुद्ध चौथे वनडे शतक नोंदवणारा विराट कोहली पुन्हा एकदा भारतीय विजयाचा हिरो ठरला. त्याने 111 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा जमविल्या. विशेष म्हणजे चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील त्याचे पहिलेच शतक आहे. दोन्ही सामने जिंकून 4 गुणांसह भारताने गटात अग्रस्थान मिळविले आहे. या विजयानंतर देशभर पुन्हा एकदा खुशीचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

पाकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संथ सुरुवात करीत नवव्या षटकांत 41 धावांची भर घातली. बाबर आझम व इमाम उल हक झटपट बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवान व सौद शकील यांनी डाव सावरणारी खेळी करीत 104 धावांची भागीदारी केली. पण नंतर ठरावीक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि 241 धावांत त्यांचा डाव संपुष्टात आला. कुलदीप यादव सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 40 धावांत 3, हार्दिकने 2, अक्षर पटेल, हर्षित राणा यांनी एकेक बळी मिळविले.

रोहितने सुरुवात चांगली केली. पण 15 चेंडूत 20 धावा करून तो बाद झाल्यानंतर फटकेबाजीस कठीण असलेल्या खेळपट्टीवर कोहली व गिल यांनी सावध खेळ करीत 69 धावांची भर घातली. गिल 46 धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयसने अर्धशतकी खेळी करीत विराटला चांगली साथ देत 114 धावांची भागीदारी करीत भारताला विजयासमीप आणले. कोहलीने नंतर अक्षरच्या साथीने 43 व्या षटकांत चौकार ठोकत विजय साकार करताना शतकही पूर्ण केले. पाकच्या या दुसऱ्या पराभवामुळे त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. त्यांना आता इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. पण त्यांचा नेट रनरेट -1.087 इतका खाली असल्याने त्यांच्यासमोर खूप कठीण आव्हान आहे. सोमवारी न्यूझीलंडने बांगलादेशवर विजय मिळविला तर पाक स्पर्धेबाहेर होईल.

वनडेचा बादशाह, विराट कोहली

पाकविरुद्ध सामन्यात 15 धावा करत विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये 14 हजार धावा पूर्ण करून इतिहास लिहिला आहे. तो वनडेमध्ये सर्वात जलद 14 हजार धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने केवळ 287 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा 19 वर्षे जुना विश्वविक्रम मोडला आहे. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 350 डावात 14 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विशेष म्हणजे, वनडे क्रिकेटच्या इतिहासात 14 हजारहून अधिक धावा करणारा विराट हा केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचा सचिन तेंडुलकर (18,426 धावा) आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा (14234 धावा) यांनी ही कामगिरी केली होती.

Comments are closed.