कोल्हापुरातील खड्ड्यांची खंडपीठाकडून दखल; महाराष्ट्र शासनासह आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस

शहरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेसंदर्भात सजग कोल्हापूरकरांच्या जनहित याचिकेची कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गंभीर दखल घेतली आहे. यातून महाराष्ट्र शासनासह कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि सचिव नगरविकास मंत्रालय यांच्या नावाने नोटीस जारी केली आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. यासंदर्भात आपल्याला अजून कोणत्याही प्रतिवादींचे उत्तर मिळालेले नाही, अशी माहिती अ‍ॅड. योगेश सावंत यांनी दिली.

कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्ते उदय नारकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. अनिल माने, भारती पोवार, अ‍ॅड. सुनीता जाधव, डॉ. तेजस्विनी देसाई यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. श्रीया आवले, अ‍ॅड. योगेश देसाई, अ‍ॅड. सिद्धी दिवाण, अ‍ॅड. हेमा काटकर यांच्या मदतीने दाखल केलेल्या या जनहित याचिकेची प्राथमिक सुनावणी दि. 3 नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अजित कडेठाणकर यांच्यासमोर झाली होती. कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटींची आर्थिक तरतूद केल्याचा पुरावा सादर करताना अ‍ॅड. असीम सरोदे यांनी कोल्हापुरातील तब्बल 70 रस्त्यांबाबतची खड्डेमय परिस्थिती दाखविणाऱ्या फोटोंकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

वाईट रस्ते, खड्डे, रस्त्यांवरील धूळ आणि लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्या मांडून अ‍ॅड. सरोदे यांनी सामान्य माणसांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन खड्डेमय रस्त्यांमुळे होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने प्रतिवादी सरकारी यंत्रणांना 24 नोव्हेंबरपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिलेले आहेत.

दर्जाहीन रस्त्यांमुळे मणक्यांचे आजार वाढले

उदय नारकर, डॉ. रसिया पडळकर म्हणाले की, गेली अनेक वर्षे सातत्याने कोल्हापुरातील रस्ते अत्यंत खराब होत चालले आहेत. 2-3 वर्षांनी येणारा पूर, कमी वेळात होणारा प्रचंड पाऊस, पाण्याचा त्वरित निचरा न होणारी निर्माण केली गेलेली रस्त्यांची रचना आणि वाढलेली रहदारी या सर्वांमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे. यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही. अत्यंत तुटपुंजी आणि गलथान पद्धतीने केली जाणारी डागडुजी, कोठेही, कशाही पद्धतीने रस्ते उकरायला दिली जाणारी परवानगी आणि विविध युटिलिटीच्या कामांसाठी उकरलेले रस्ते, यामुळे कोल्हापूर शहर हे एखाद्या उद्ध्वस्त झालेल्या शहरासारखे भासू लागले आहे. उपननगरातील रस्त्यांबाबत तर यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. रस्त्यांच्या या अत्यंत दर्जाहीन परिस्थितीमुळे मणक्यांचे दुखणे, कमरेचे दुखणे, गाड्यांच्या देखभाल खर्चामध्ये प्रचंड वाढ आणि धुळीच्या लोटांमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. याशिवाय, खराब रस्त्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली असून, वाहतूककोंडी, त्यामुळे खर्च होणारे अधिकचे इंधन हे सर्वच आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे.

Comments are closed.