Kolhapur News – कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून बैलगाडी शर्यत, धावताना बैलाचा दुर्दैवी मृत्यू; सरपंचासह यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल

जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश, प्रांताधिकारी यांची परवानगी नसताना तसेच पोलिसांनी मज्जाव करून सुद्धा कायदा सुव्यवस्थेला धाब्यावर बसवून करवीर तालुक्यातील वडणगे येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले. दुर्दैवाने धावताना बैलाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना आता समोर आली आहे. काँक्रिटच्या रस्त्यावर शर्यतीत धावताना अनेक बैल घसरून जखमी झाले. मागोमाग दुचाकीस्वारांची हुल्लडबाजी सुरू होती, काहींनी बैलांना शॉक देत, निर्दयीपणे मारहाणही केली.

ग्रामपंचायत, यात्रा कमिटीच्या वतीने शुक्रवारी (28 फेब्रुवारी 2025) बैलगाडी, घोडागाडी शर्यतीचे आयोजन केले होते. वडणगे-शियेदरम्यानच्या राज्यमार्गावर वडणगेतील संघर्ष चौक ते कुशिरे येथील वीटभट्टी असा शर्यतीचा मार्ग होता. त्यामुळे पाच ते सहा तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती. डांबरी व काँक्रिंटच्या रस्त्यावर पाय घसरून पडल्यामुळे काही बैल व घोड्यांना दुखापत झाली. शर्यतीचे सर्व नियम व अटी धाब्यावर बसवून परवानगी न घेता शर्यती घेतल्या कशा? असा प्रश्न उपस्थित होत असताना, सायंकाळी करवीरचे प्रांताधिकारी यांची परवानगी नसताना तसेच जिल्हाधिकारी यांचा कोल्हापूर जिल्हयामध्ये बंदी आदेश लागु असताना विनापरवाना बेकायदेशीर आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन बैलगाडी, घोडागाडी, मनुष्य बसवुन घोडा पळविणे अशा प्रकारच्या शर्यती घेतल्याने, करवीर पोलीस ठाण्यात यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास रघुनाथ पोवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंच संगिता शहाजी पाटील, उपसरपंच सविता यशवंत लांडगे, सदस्य महेश शिवाजी सावंत, पद्मश्री संतोष लोहार, रेश्मा अमोल तेलवेकर, जयवंत दगडु कुंभार, उमाजी पांडुरंग शेलार, राधीका संजय माने, संतोष बाबुराव नांगरे, नितीन तुकाराम साखळकर, सतीश बाळासौ पाटील, रुपाली विजय जाँदाळ, ज्योती चंद्रकांत नरके, रोहीत पांडुरंग पोवार, संगिता मोहन नांगरे, ऋषिकेश अनिल ठाणेकर, स्वाती यशवंत नाईक, स्वप्नाली नितीन नाईक आणि बाजीराव (नाना) सदाशिव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शर्यतीत धावताना बैल मेला पण त्याबाबत कसलाच गुन्हा दाखल नाही, पोलिसांवरही दबाव?

बेकायदेशीरित्या झालेल्या या बैलगाडी शर्यतीत एकतर मुक्या प्राण्यांना माराहन करण्यात आली त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला, काँक्रिटच्या रस्त्यावर शर्यत घेतली. पोलिसांनी याप्रकरणी राजकीय दबाव झुगारून यात्रा कमिटी वर गुन्हा दाखल केला. पण शर्यतीत धावताना मृत्यूमुखी पडलेल्या, जखमी झालेल्या त्या मुक्या जनावरांचे काय? पोलिसांचा विरोध डावलून ही शर्यत घेताना अक्षरशः हुल्लडबाजी करुन, आव्हानात्मक भाषा वापरून दहशत माजविणाऱ्या तसेच चित्रीकरण करण्यास रोखणाऱ्या त्या प्रवृत्तीवर कारवाई होणार की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक पत्रकारांवरही याप्रकरणी प्रचंड दबाव टाकण्यात आल्याचीही चर्चा पंचक्रोशीत होऊ लागली आहे.

दरम्यान, जमावबंदी आदेश असताना, विनापरवाना बैलगाडी शर्यती घेतल्याप्रकरणी यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली. त्यानुसार‌ सरपंच संगिता शहाजी पाटील ,उपसरपंच सविता यशवंत लांडगे यांच्या सह 19 जणांविरुद्ध प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 (2) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.