Kolhapur News – घोर अवमान! शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पडद्याआड पुतळ्यासमोर अश्लिल नृत्याचा कार्यक्रम
करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीकडून महापुरुषांचा घोर अवमान करणारा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची जय्यत तयारी झाली असताना, बुधवारी (18 फेब्रुवारी) रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पडद्याआड करण्यात आलं आणि त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यासमोरच नृत्यांगनांचा बिभित्स धिंगाणा पहायला मिळाला. विशेष म्हणजे यावेळी ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं. मात्र, शिवजयंतीचे औचित्य साधत वातावरण निवळण्याची शक्यता होती. उत्साहात शिवजयंती साजरी करण्यासाठी राज्यभरात जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, करवीर तालुक्यातील वडणगे गावात शिवजयंतीच्या आदल्या दिवशी ग्रामपंचायतीकडून शिवजयंती उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. रात्री ग्रामपंचायत इमारतीच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर स्टेज लावून मध्ये पडदा लावण्यात आला पुतळ्यासमोर लावणीच्या नावाखाली बिभित्सपणे नृत्यांगणा थिरकल्या.
धक्कादायक बाब म्हणजे महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त ग्रामपंचायतीने हा कार्यक्रम ठेवल्याच उघड झालं आहे. भजन, किर्तन व सत्संगाच्या कार्यक्रमाची अपेक्षा असताना अशाप्रकारचा धांगडधिंगा कोणासाठी? असा सवाल आता उपस्थित होत आहे. निदान शिवजयंती व शिवपुतळयाचे भान ठेवायला हवे होते, अशी प्रतिक्रिया काही सुज्ञ शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.
गतवेळी बेकायदा बैलगाडी शर्यत घेतल्याने सरपंचांसह ग्रामपंचायत कार्यकारिणीवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यावेळी डांबरी व काॅंक्रिटच्या रस्त्यावर शर्यतीत पळताना एका बैलाचा मृत्यू झाला होता, तर त्याच्या आदल्या वर्षी शर्यतीवरून दोन गटात हाणामारी होऊन ३०७ चे गुन्हे दाखल झाले आहेत. तरीसुद्धा ग्रामपंचायत कार्यकारणीच्या वागणुकीत काहीच फरक पडत नसल्याचे व त्यांना मिळणाऱ्या राजकीय नेत्यांचा आशिर्वाद या घटनेवरून दिसून येत आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर मते मागणारे आणि सत्ता उपभोगणाऱ्या या तथाकथित लोकांचे चक्क पुतळ्यालाही पडद्यामागे ठेवून असे कार्यक्रम घेण्याचे धाडस होते तरी कसे? तेही शिवजयंतीच्या तोंडावर हे कितपत योग्य आहे? असा संतप्त सवाल शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे.
Comments are closed.