कोल्हापूर असुरक्षित; पाकिस्तानी, बांगलादेशींना शोधून हाकला, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास शिवसेना राबविणार शोधमोहीम

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानशी संबंध तोडले असले, तरी अजूनही पाकिस्तानी नागरिक हिंदुस्थानात वास्तव्यास आहेत. याबाबत मंत्र्यांच्या भूमिकाही संदिग्ध असल्याने हे धोकादायक आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातही दहशतवाद्यांशी संबंधित काही घटना समोर आल्याने असुरक्षित बनलेल्या या जिल्ह्यात लपलेल्या पाकिस्तानी व बांगलादेशींना शोधून हकलून द्या, अशी मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात जबाबदार प्रशासन दुर्लक्ष करणार असेल, तर शिवसेना स्वतः ही शोधमोहीम राबविणार असल्याचा इशाराही देण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

कश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर पोलीस व जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर वास्तव्य करणारे पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम जलद गतीने करावी. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामधील इरफान अत्तारसारखा अतिरेकी कश्मीरमध्ये 2008 साली मारला गेला, हे विसरून चालणार नाही. अनेक ठिकाणी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यासह ध्वज फडकविल्याच्या संतापजनक घटनाही घडल्या आहेत.

करवीर तालुक्यातील नागदेववाडी येथे बांगलादेशी महिला बेकायदा राहत असल्याचे आढळले होते. तसेच यापूर्वी दहशतवादी हल्ल्यातील कर्नाटकमधील यासीन भटकळचा थेट संबंध देशाने अनुभवला आहे. पाकिस्तानी व बांगलादेशी नागरिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहतात. त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ते औद्योगिक, बांधकाम व सोने चांदी कारागीर (गुजरी) यांसारख्या अनेक ठिकाणी काम करीत आहेत. या सर्वांचा शोध पेऊन त्यांची माहिती पोलीस प्रशासनाकडे असणे आवश्यक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

जमातीच्या निमित्ताने धार्मिक कारणासाठी जे मुस्लिम लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातात व परराज्यांतून येतात, त्यांची नावे व सविस्तर माहिती पोलीस प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी 40 लहान मुले एका टेम्पोमध्ये सापडली होती. त्याचे पुढे काय झाले, याचा तपास पुढे आला नाही. जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपआपल्या कारकिर्दीसाठी सोयीची भूमिका घेण्यासाठी अक्षम्य दुर्लक्ष करू नये. गोवा, कोकण समुद्रमार्ग, तसेच कर्नाटक ही ठिकाणे जवळ असल्याने कोल्हापूर जिल्हा हे भविष्यात पाकिस्तानी व बांगलादेशी कट्टर धर्मांधांचा अड्डा होऊ शकतो, या गंभीर बाबीकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले.

Comments are closed.