राधानगरीतील हरप नदीवरील लोखंडी साकव खचला; मानबेट, राई व चौके या गावांची वाहतूक बंद

जोरदार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील चौके येथील हरप नदीवरील लोखंडी साकव आज सकाळी खचला. नदीतील मधला पिलर झुकला असून तो केंव्हा ही वाहून जाऊ शकतो. परिणामी मानबेट, राई व चौके या गावांचा इतर गावांशी संपर्क आणि वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे . संबंधित विभागाने यावर तात्काळ तोडगा नाही काढला तर येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होणार आहे.
यापूर्वी गेल्या दोन महिन्यात येथील पूल दोनवेळा वाहून गेला. हरप नदीचे पात्र विस्तारल्यामुळे प्रशासनाने जुन्या लोखंडी साकवाला समांतर साकव जोडून फक्त पायी येण्या जाण्यासाठी मार्ग तयार केला. आता सततच्या जोरदार पावसामुळे हरप नदी मोठ्याने प्रभावित झाली आहे. परिणामी जुन्या लोखंडी साकवाचा पिलर कमकुवत झाल्याने तो झुकला आहे. त्यामुळे लोखंडी साकव मधून काहीसा क्रॅश झाला आहे.
प्रशासनाचे इकडे फारसे लक्ष नसते. धामणी धरणाच्या घळ भरणी आधी हरप नदी आणि चौके येथील कॅनॉल वरील पुल बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता आधी धरणाची घळभरणी करुन पुलाची कामे पावसाळा सुरू झाला, तरीही अपूर्ण ठेवली होती. परिणामी मोठ्या पावसाने हा पूल दुसऱ्यांदा वाहून गेला आणि आता साकवसुद्धा मोडत आला आहे त्यामुळे मानबेट, राई व चौके या गावांचा इतर गावांशी संपर्क बंद झाला आहे.
आजारी व्यक्ती,शालेय विद्यार्थी, दुध वाहतुक, शेती अवजारे, शेतीसाठी लागणारी खते ने आण करणे पूर्णतः बंद पडले आहे. येथील नागरीकांना जिवनाश्यक वस्तू उपलब्ध करणे ही कठीन होणार आहे. पावसाळा अजून दोन महीने असून चौके, राई व मानबेट येथील नागरीक चिंतेत आहेत. प्रशासनाने यावर तात्काळ मार्ग काढून लोकांची गैरसोय टाळावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.
Comments are closed.