महिलेला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण; ऍट्रॉसिटीचा गुन्हा

घटस्फोटप्रकरणी कामानिमित्त गेलेल्या महिलेला न्यायालयाच्या आवारात जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी तब्बल 15 वकिलांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मुंबई आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांचाही समावेश असल्याने कायदे वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काजल शेळके, मनीषा सातपुते, साक्षी निकम, हर्षा खंडेलवाल, संदीप चौगुले, व्ही. आर. पाटील, संदीप देशपांडे, नारायण भांदिगरे, विवेक घाटगे, सुरज भोसले, स्वाती तानवडे, तृप्ती किनरे, विद्या कांबळे देशमुख, जे. जे. देसाई आणि शिल्पा सुतार,अशी गुन्हा दाखल झालेल्या वकिलांची नावे आहेत.

पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार दि. 7 मार्चला दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीतील तळमजल्यावरील झेरॉक्स सेंटर परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी अश्विनी उर्फ पल्लवी निखिल पाटील (वय 30, रा. वारणा कोडोली, ता. पन्हाळा) या सुनावणीसाठी कोर्टात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पती निखिल यांच्याकडे कपडे व घरगुती साहित्याची मागणी केली. याच वेळी ऍड. काजल शेळके यांनी हस्तक्षेप करत फिर्यादीचा जातीवाचक उल्लेख केला. ‘तुमची भीक मागायची लायकी आहे’, असे म्हणत त्यांनी अश्विनी यांच्या कानशिलात लगावल्याने त्यांच्या गालातून रक्त आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर हिरकणी कक्षासमोर गोंधळ उडाला. गोंधळ ऐकून घटनास्थळी आलेल्या इतर वकिलांनीही फिर्यादीला धमकावत ‘हिला बाहेर काढा, हिला मारायचे आहे, हिचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये,’ अशा शब्दांत जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलंय.

फिर्यादीच्या तक्रारीवरून शाहूपुरी पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव करत आहेत.

Comments are closed.