IPL 2026: हंगाम सुरु होण्याआधीच केकेआर संकटात, दुखापतग्रस्त गोलंदाजांसह कसा होणार चॅम्पियन?

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरू होत आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला पुन्हा एकदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात असल्याचे दिसते, मात्र हंगाम सुरू होण्याआधीच संघांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तीन वेळेचा विजेता केकेआरने मेगा लिलाव आणि रिटेन्शनमध्ये चांगले डोके लावले, परंतु वेगवान गोलंदाजांच्या दुखापतीचा संघाच्या संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आगामी हंगाम सोपा राहणार नाही.

केकेआरने कर्णधारपदी अजिंक्य राहाणेला कायम ठेवले आहे. त्याने आयपीएलच्या २०२५च्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याचे नेतृत्व, अनुभव आणि वरच्या फळीतील उत्तम फलंदाजी हे संघासाठी महत्वाचे आहे. रिटेन्शनमध्ये सुनील नारायण, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांचा समावेश आहे. केकेआरने लिलावामध्ये कॅमेरुन ग्रीनसाठी मोठी रक्कम मोजली. त्याला संघाने विक्रमी २५.२० कोटी रुपयांना खरेदी केले, जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. दुसरी मोठी खरेदी मथिशा पथिराणा ( १८ कोटी रुपये) होती. तो डेथ ओव्हर्ससाठी महत्वाचा गोलंदाज आहे.

केकेआरचा संघ पाहता तो मजबूत वाटत आहे, मात्र अनेकांना झालेल्या दुखापतींमुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये पथिराणा, हर्षित राणा, वैभव अरोरा, उमरान मलिक, आकाशदीप आणि कार्तिक त्यागी यांचा समावेश आहे. यामधील हर्षित दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर झाला आहे, तर २०२६ च्या टी२० विश्वचषकादरम्यान पथिरानाला दुखापत झाली होती. यामुळे सहभागाबाबत शंका निर्माण झाली आहे. तो ही सामन्यांमध्ये खेळू शकला नाही तर संघाची गोलंदाजी आणखी कमकुवत होईल.

केकेआरकडे उमरान, आकाशदीप आणि कार्तिक यांचा पर्याय आहे, मात्र उमरानला दुखापतींचा इतिहास आहे. संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे नुकतेच त्यांनी ब्लेसिंग मुजाराबानीला करारबद्ध केले आहे. त्यामुळे त्यांची थोडीफार चिंता कमी झाली आहे, मात्र डेथ ओव्हर्समध्ये हर्षित आणि पथिरानाची उणीव भासेल.

फलंदाजीत केकेआरमध्ये फिन ऍलन आणि रहाणे हे वरच्या फळीला मजबूत बनवतील. संघातील ग्रीन, रोवमन पॉवेल, रमणदीप सिंग आणि अंगक्रिश रघुवंशी हे पण आहेत. तसेच फिनिशरसाठी रिंकूचा पर्याय आहेतच.

आयपीएल २०२६ साठी केकेआर असोसिएशन- अजिंक्य रहाणे (कर्णधार) रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, सुनील नरेन, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, वैभव अरोरा, उमरान मलिक, कॅमेरॉन ग्रीन, फिन ऍलन, मथिश पथीराना, राहुल सिंग, तेजस्वी सिंग, राहुल त्रिपाठी, टिम सेफर्ट, ब्लेसिंग मुजारबानी, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी आणि आकाशदीप.

Comments are closed.