हिंदुस्थानच्या चौघींचा ऐतिहासिक विजय; हम्पी, हरिका, वैशाली, दिव्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत

मागील वर्षी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱया हिंदुस्थानी महिला बुद्धिबळ संघाने फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेतही इतिहास घडवला. जागतिक बुद्धिबळ दिनाच्या पूर्वसंध्येला हिंदुस्थानच्या चार महिला खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत धडक देत ऐतिहासिक कामगिरी केली. कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, आर. वैशाली आणि इंटरनॅशनल मास्टर दिव्या देशमुख यांनी चौथ्या फेरीतील निर्णायक टायब्रेकमध्ये विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
दिव्याचा झिन्झूवर विजय
चीनच्या झिन्झूविरुद्ध दिव्या देशमुख हिने 2.5-1.5 असा विजय मिळवत सर्वात मोठा धक्का दिला. पहिला गेम जिंकल्यानंतर दुसऱया गेममध्ये बरोबरी साधत दिव्याने सामना आपल्या नावावर केला.
हम्पीचा कोस्टेनीयुकवर दणका
कोनेरू हम्पी हिने रशियाच्या माजी विश्वविजेत्या अलेक्झांड्रा कोस्टेनीयुक हिचा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. कोस्टेनीयुक 2021 वर्ल्ड कप विजेती होती. हरिका द्रोणावल्ली हिनेही टायब्रेकमध्ये पराभवानंतर जोरदार पुनरागमन करत रशियाच्या पॅटरिना लाग्मो हिच्यावर 3.5-2.5 असा विजय मिळवला.
वैशालीची आठ गेमची संघर्षमय लढत
आर. वैशाली हिने कझाकिस्तानच्या मेरुफ कमालिदेनोवा हिच्याविरुद्ध आठ गेमची दीर्घ लढत खेळत 4.5-3.5 अशा फरकाने बाजी मारत आगेकूच केली.
बुद्धिबळ जगताच्या हिंदुस्थानी खेळाडूंवर नजरा
फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरिका द्रोणावल्ली आणि दिव्या देशमुख यांच्यात थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे हिंदुस्थानचा किमान एक खेळाडू उपांत्य फेरी गाठणार हे निश्चित आहे. दुसरीकडे उपांत्यपूर्व लढतीत कोनेरू हम्पी हिचा सामना चीनच्या युझिन साँगसोबत, आर. वैशालीचा सामना चीनच्या जीयूमी तानसोबत होणार आहे. यापूर्वी एकाही हिंदुस्थानी महिला खेळाडूने विश्वचषक जिंकलेला नाहीये. त्यामुळे आता अवघ्या बुद्धिबळ जगताच्या नजरा हिंदुस्थानी खेळाडूंच्या कामगिरीकडे लागल्या आहेत.
Comments are closed.