कोकणात थंडीची चाहूल आणि अंगणात दरवळतोय पोपटीचा सुगंध

कोकणातली थंडी म्हणजे फक्त गारवा नाही, तर जिभेवर नाचणाऱ्या चवींचाही हंगाम. सणासुदीचा माहोल अजून ओसरलेलाच नसतो आणि घराघरांत गुलाबी थंडीची चाहूल लागताच एकच सवाल सुरू होतो  “यंदाची पोपटी कधी करायची?” कारण कोकणाच्या मातीतला हा एक अनोखा, गावाकडचा पारंपरिक प्रकार… आणि ज्याची चव जगातल्या कुठल्याही मोठ्या हॉटेलात मिळत नाही.

थंडीच्या दिवसांत वाल, पावटे यांचं भरघोस उत्पादन असतं. बाजारात त्यांचा सुगंध दरवळू लागतो आणि मग गावातल्या अंगणातून बोचऱ्या थंडीत पोपटीचा बेत आखला जातो. घरातली मडकी बाहेर काढली जातात, केळीची हिरवीगार पानं धुऊन मडक्याच्या आत लावली जातात. तळाशी भांबुर्डी किंवा भामरुटाचा पाला पसरवून जणू निसर्गाचंच अंथरूण तयार केलं जातं.त्यावर एकेक थर घालत ही कोकणी जादू सुरू होते, वालाच्या शेंगा, पावटे, बटाटे, भाज्या, ओव्यासारखा अंगावर येणारा मसाला, हळदीचा सुवास… आणि मांसाहार करणाऱ्यांसाठी मासे किंवा चिकनचे तुकडे. हे सगळं थरावर थर रचून मडक्याचं तोंड पुन्हा भांबुर्डीच्या पाल्यानं घट्ट बंद केलं जातं.

नंतर अंगणात खड्डा खणला जातो, त्यात विस्तव पेटवला जातो आणि हे मडकं जणू निसर्गाच्या हळुवार शेकोटीत शिजू लागतं. तासभर–दीडतासभरात त्या मडक्यातून उठणारा खमंग सुगंध गावभर पसरतो  आणि मग तयार होते ती कोकणातली खास, चटकदार, अंगावर काटा आणणारी पोपटी.

पूर्वी हे बेत गावकरी एकत्र येऊन, मोकळ्या माळावर किंवा घराच्या अंगणात करायचे. लोक एकत्र बसायचे, गप्पा सुरू व्हायच्या… पोपटी हा फक्त पदार्थ नाही, तर एकत्र येण्याचा उबदारपणा होता. आजही त्याची परंपरा तितकीच जिवंत आहे, इतकी की आता तर खास ‘पोपटी पार्ट्या’ आयोजित केल्या जातात.थंडी सुरू झाली की कोकणातल्या हवेत जसा धुरकट गारवा पसरतो, तसाच मडक्यातल्या पोपटीचा सुगंधही… आणि कोकणातलं गावजीवन पुन्हा एकदा चवीने, उबदारपणाने उजळून निघतं.

Comments are closed.