‘वंदे भारत’ची गुरांना धडक; कोकण रेल्वे विस्कळीत, आंगणेवाडी जत्रेहून परतणाऱ्या प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोकण रेल्वेच्या वाहतुकीचे वेळापत्रक सोमवारी पूर्णपणे विस्कळीत झाले. सकाळी गोव्याच्या दिशेने चाललेल्या ‘वंदे भारत’ ट्रेनची गुरांना धडक बसली. जोरदार धडकेत फेकले गेलेले एक जनावर ओव्हरहेड वायरच्या खांबावर आदळल्याने रेल्वेच्या विद्युत पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे दोन्ही दिशेकडील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली. मुंबईकडे येणाऱ्या आणि कोकणात जाणाऱया सर्व गाड्या जागोजागी रखडल्या. दिवसभर चार ते पाच उशिराने गाड्या धावल्यामुळे आंगणेवाडी जत्रेहून माघारी परतणाऱ्या मुंबईकर-ठाणेकरांची प्रचंड हाल झाले.

कुडाळ स्थानकाजवळ सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘वंदे भारत’ ट्रेनची गुरांना धडक बसली. मोठय़ा प्रमाणावर गुरे रेल्वे रुळावर आली होती. ‘वंदे भारत’ ट्रेन सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांदरम्यान असताना ही घटना घडली. गुरांच्या धडकेमुळे ओव्हरहेड वायरच्या खांबाचे नुकसान झाले आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ‘वंदे भारत’ ट्रेन गोव्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. तीन तासांच्या अवधीत मडगावहून मुंबईकडे येणाऱया गाडय़ा थिवीम, सावंतवाडी, कुडाळ आदी भागांत थांबवून ठेवल्या होत्या. तसेच गोव्याच्या दिशेने चाललेल्या अनेक गाडय़ांची चिपळूण, रत्नागिरी, कणकवली अशाप्रकारे जागोजागी रखडपट्टी झाली होती. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. सोमवारी आंगणेवाडी जत्रेला हजेरी लावून मोठय़ा प्रमाणावर भाविक माघारी परतत होते. त्यांच्या परतीच्या प्रवासात कोकण रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाचे विघ्न उभे ठाकले. दुपारनंतर रेल्वे वाहतूक सुरू झाली, मात्र सर्वच गाडय़ा चार ते पाच तास उशिराने धावल्या.
कोकण रेल्वेच्या मार्गात मोकाट जनावरांची समस्या आहे. नागरिकांनी रेल्वे रुळाच्या परिसरात गुरे जाणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले.

जनशताब्दी, मांडवीसह अनेक गाडय़ांची रखडपट्टी

कोकण रेल्वेच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेकडील वाहतुकीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. 22229 वंदे भारत एक्स्प्रेस, 12051 जनशताब्दी एक्स्प्रेस, 10104 मांडवी एक्स्प्रेस, 09057 सुरत-मंगळुरू एक्स्प्रेस, 12224 दुरांतो एक्स्प्रेस, 22413 राजधानी एक्स्प्रेस, 12977 मारुसागर एक्स्प्रेस या गाडय़ा विविध स्थानकांत रखडल्या. अनेक गाडय़ा कोकणातून मुंबईत उशिराने पोहोचल्या. त्याचा रात्री कोकणात जाणाऱया गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

Comments are closed.